

पालघर ः पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही मुंबई महापालिका क्षेत्रातील बांधकामांच्या साईट वरील राडारोड्याची विल्हेवाट पालघर तालुक्यातील मुंबई-अहमदाबाद महामार्गा लगतच्या जमिनींवर भराव करून केली जात आहे.नुकताच पार पडलेल्या नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्र्यांनी राडारोड्याच्या भरावा संबधी नाराजी व्यक्त केली होती.राडारोड्याची विल्हेवाट शास्त्रशुद्ध पद्धतीने लावण्यासाठी यंत्रणा विकसित करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले होते.तसेच राडरोडा वाहतूक करणार्या वाहनांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
मुंबई अहमदाबाद महामार्गा लगतच्या स्थानिक आदिवासींच्या वन जमिनींवर मुंबईतुन आणलेल्या राडारोड्याचा भराव राजरोसपणे केला जात आहे.राडा रोड्याच्या भरावासाठी वन आणि महसूल विभागाची प्रकारची परवानगी लागत नसल्याचा फायदा भराव फियांकडून घेतला जात आहे. मुंबई महापालिका आणि जिल्हा प्रशासनाने खाडी परिसरतसेच डम्पिंग ग्राउंडवर राडा रोडा आणि बांधकामाचा कचरा टाकण्यावर निर्बंध लादल्याने राडारोडा पालघर जिल्ह्यात आणला जात आहे.
मुंबईतील राडा रोडा राजरोसपणे मुंबई अहमदाबाद महामार्गालगतच्या मोकळ्या भूखंडांवर टाकले जात आहे. मुंबई वरून राडा रोडा भरून येणारे डंपर रात्रीच्या वेळी महामार्गालगतच्या जमिनींवर रिकामे केले जातात.राडारोडा आणि कचर्याचा वापर भरावासाठी केला जात आहे. राडा रोड्याचा भराव टाकणार्यांवर कारवाई केली जात नसल्याने भराव माफियांचे फावले आहे. राडा रोड्याच्या अनिर्बंध भरावामुळे अनेक ठिकाणी नाले बंद झाले असून महामार्गावर काही ठिकाणी पावसाचे पाणी तुंबल्याने वाहतूकीवर परिणाम होत आहे.तसेच महामार्गालगत टाकलेल्या राडा रोड्यामुळे परिसराचे विद्रुपीकरण होत आहे.
पालघर तालुक्याच्या हद्दीतील कुडे,हालोली, साये आणि दुर्वेस गावांच्या हद्दीत महामार्गा लगतच्या जमीनींवर राडारोड्याचा भराव करण्यात आला आहे. पालघर तालुक्याच्या हद्दीत होणारी राडारोडा वाहतूक आणि भरावा विरोधातील कारवाई बाबत माहितीसाठी पालघर उपविभागीय अधिकारी श्याम मदनूरकर यांना संपर्क साधला असता त्यांनी उत्तर दिले नाही.