

पालघर : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाने घोषणा केल्यामुळे राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पालघर दौरा रद्द झाला आहे. आज (मंगळवार) रोजी पालघरच्या कोळगाव सिडको मैदानावर मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार होता.
मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियानाच्या माझी लाडकी बहीण योजनेसह जिल्ह्यातील विविध विकास कामांचे भूमिपूजन या कार्यक्रमात केले जाणार होते. अचानक ठरलेल्या या दौऱ्यामुळे प्रशासनाची आयोजनासाठी दगदग सुरू होती व त्यातच मंगळवारपासून आचारसंहिता लागू झाल्याने हा दौरा रद्द झाला व प्रशासनाने सुटकेचा निःश्वास टाकला. मुख्यमंत्री पालघरमध्ये येणार असल्यामुळे निवासी उपजिल्हाधिकारी यांनी वाहतूक अधिसूचना जाहीर करत पालघर बोईसर रस्त्यावरील जड अवजड वाहतूक बंदी केली होती. मात्र आता दौरा रद्द झाल्यामुळे ही अधिसूचनाही रद्द करण्यात आली आहे. पालघरच्या दौऱ्यानंतर आचारसंहिता लागू होईल, असे अपेक्षित असताना निवडणूक आयोगाने मंगळवारी निवडणूक कार्यक्रम घोषित केला. आचारसंहिता लागू झाल्यामुळे सर्व कार्यक्रम आपोआप रद्द झाले आहेत. यामुळे मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी केलेल्या त्यांच्या नेतेमंडळी व कार्यकर्त्यांमध्ये कार्यक्रम रद्द झाल्याची नाराजी पसरली आहे.