

मनोर ः मुंबई अहमदाबाद मेंढवण खिंडीच्या गुजरात मार्गीकेच्या उतारावरील धोकादायक वळणावर असलेल्या पुलावर कंटेनर उलटून अपघात झाला आहे. शनिवारी दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास झालेल्या अपघातातील अपघातग्रस्त कंटेनर मधील हायड्रोजन पेरॉक्साइच्या पिंपातून गळती सुरु झाल्याने कंटेनर मधून मोठया प्रमाणात धूर निघत होता.
कंटेनर मधून निघणार्या धुरामुळे वाहन चालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.अपघात ग्रस्त कंटेनर गुजरात मार्गीकेवर आडवा पडल्याने महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. कंटेनर चालक जखमी झाला आहे. दरम्यान वाहतूक पोलिसांनी पुलाच्या सर्व्हिस रोडवरून एकेरी वाहतूक सुरु वाहतूक धिम्या गतीने सुरु झाली आहे.
दरम्यान वाहतूक पोलिसांसह कासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अविनाश मांदळे तसेच वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. अपघात ग्रस्त टँकर हटवण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत.तसेच अग्निशमन दलाचा एक बंब दाखल झाला आहे. कंटेनर मधून गळती होत असलेला हायड्रोजन पेरॉक्साइड धोकादायक नसल्याने दोन क्रेनच्या साहाय्याने कंटेनर हटवण्याच्या निर्णय वाहतूक पोलिसांनी घेतला आहे.एक क्रेन उपलब्ध झाली असून लवकरच दुसरी क्रेन घटनास्थळी दाखल होणार होती.