

विरार ः ऑनलाइन गेम खेळण्यासाठी अवघ्या 16 वर्षांच्या मुलाने आईकडे लाखो रुपयांची मागणी केली. आईने पैसे देण्यास नकार दिल्यावर रागाच्या भरात तिच्या डोक्यावर जोरदार प्रहार करत तिची हत्या केली. या धक्कादायक प्रकारानंतर वडिलांनीही गुन्हा झाकण्यासाठी साथ दिली आणि दोघांनी मिळून मृतदेहाचा गुप्तपणे अंत्यविधी केला. या घटनेमुळे नालासोपारा परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
संबधीत महिलेचा तिच्या सावत्र अल्पवयीन मुलाने खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. हे तिघं नालासोपार्यातील एका इमारतीत राहत होते. मुलाने गेम खेळण्यासाठी आईकडे लाखो रुपयांची मागणी केली होती. मात्र, आईने स्पष्टपणे नकार दिल्यावर त्याने संतापाच्या भरात थेट तिचा जीव घेतला.
आईच्या मृत्यूनंतर घरात घडलेली ही घटना नैसर्गिक असल्याचे भासवण्यासाठी आरोपी मुलगा आणि त्याचे वडील दोघांनी मिळून मृतदेह शेजारच्या स्मशानभूमीत नेऊन गुपचूप अंत्यविधी उरकला. मृत्यूच्या कारणावर संशय आल्याने पोलिसांनी घटनास्थळाचा तपास सुरू केला.
घराच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर व संशयित हालचालींवरून पोलिसांना खुनाचा सुगावा लागला. शवविच्छेदन अहवालात डोक्याला जोरदार मार झाल्याचे स्पष्ट होताच हा खून असल्याचे उघडकीस आले. चौकशीत मुलाने गुन्ह्याची कबुली दिली.
ही संपूर्ण घटना उघड होताच परिसरात संतापाची लाट उसळली आहे. नात्यांची मर्यादा पार करत केवळ गेमसाठी आईचा जीव घेणं, हे समाजाला हादरवून टाकणारं आहे. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास सुरू आहे.