

बोईसर : अदानी कंपनीच्या उच्चदाब विद्युत वाहिनीची एक केबल तुटून थेट महावितरणच्या विद्युत तारेवर कोसळल्यामुळे कुकडे महागाव, दोन बंगला परिसर व त्यास लागून असलेली गावे रविवारी रात्रीच्या सुमारास अंधारात गेली. ही घटना रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. विशेष म्हणजे, तब्बल 18 तास उलटून गेल्यानंतरही अदानी कंपनीच्या कोणत्याही अधिकार्याने घटनास्थळी भेट दिलेली नाही, यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
गेल्या काही दिवसांपासून बोईसर पूर्व भागात वादळी वार्यांसह मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. परिणामी अनेक ठिकाणी झाडे कोलमडून पडत असून, काही ठिकाणी या झाडांनी थेट विद्युत तारा आणि पोल्सवर आघात केल्याने वीजपुरवठा खंडित झाल्याच्या घटना समोर येत आहेत. कुकडे महागाव आणि दोन बंगला रस्त्यावरील गावांत रविवारी रात्री वीज गेल्यानंतर सोमवारी संध्याकाळपर्यंत अंधार कायम होता.
महावितरणच्या अधिकार्यांनी प्रसंगावधान राखत वरिष्ठ तंत्रज्ञ भूषण साने आणि त्यांच्या सहकार्यांच्या मदतीने अदानीच्या हाय व्होल्टेज केबलला बाजूला करत वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आव्हान पार केले. अखेर ग्रामस्थांना अठरा तासांनंतर प्रकाशाचा उजेड अनुभवायला मिळाला आहे. मनमानी कारभारावर ग्रामस्थांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत याबाबत तातडीने चौकशी होऊन दोषींवर कार्यवाही व्हावी, अशी मागणी अभिजीत पाटील यांनी केली आहे.