

वाडा :दळणवळणाच्या सोई जितक्या जास्त तितका त्या भागाचा विकास झपाट्याने होतो हे साधे तंत्र असून सरकार देखील यासाठी आटोकाट प्रयत्न करतांना पहायला मिळते.वाडा परिसरातील लोकांना मात्र भिवंडी, कल्याण, ठाणे व मुंबईकडे जाण्यासाठी एकही मार्ग शिल्लक राहिला नसून जनतेच्या गैरसोयीला जबाबदार कोण असा प्रश्न विचारला जात आहे. वाडा ते अंबाडी मार्गे भिवंडी या महामार्गाची अवस्था दयनीय असून शिरीषपाडा मार्गे वाशिंद व अघई या मार्गांवर समस्यांचे डोंगर उभे असल्याने जनता बेजार झाली आहे.
वाडा - भिवंडी महामार्गाच्या काँक्रीटीकरणाचे काम सुरू असल्याने एकेरी मार्गावरून सर्व वाहतूक सुरू आहे. एकेरी मार्गावर गुडघ्याइतके खड्डे पडले असून जागोजागी बंद वाहनांमुळे रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळतात. कोट्यवधी रुपयांचा ठेका घेतलेली कंपनी लोकांच्या समस्या दूर करण्यात अपयशी ठरत असून लोकांनी करायचे काय असा प्रश्न पडला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे शहापूर अधिकारी कोणतीही प्रतिक्रिया देत नसून अन्य अधिकार्यांशी संपर्क होऊ शकला नाही.
कांबारे मार्गे वाशिंद या मार्गावर सावरोली गावाजवळ पूल अवजड वाहतुकीच्या अती शिरकावामुळे कमकुवत झाला असून त्याला उभी भेग पडल्याने वाहतूक मंदावली आहे. अघई मार्गे मोर्यांची कामे हाती घेतल्याने अनेक दिवसांपासून वाहतुकीला अडथळा येत असून शहराकडे जाण्याचे सर्व मार्ग अडचणीत सापडले आहेत. रुग्ण, नोकरदार व शाळकरी मुलांना याचा सर्वाधिक मनस्ताप सहन करावा लागत आहे. उन्हाळ्यात अनेकदा मागणी करूनही रस्त्यांच्या अवस्थेत सुधारणा न केल्याने आज ही समस्या उभी राहिली आहे असे लोकांचे म्हणणे असून लोकप्रतिनिधी मूग गिळून गप्प का आहेत असा सवाल विचारला जात आहे.
नेहरोली गावाच्या पुढे महामार्गावर मोरीचे काम अर्धवट करण्यात आले असून गुरुवारी सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मोरीचा भाग खचून यात सकाळीच एक ट्रक अडकला. सुदैवाने यात जीवितहानी झाली नसली तरी महामार्गावर जेमतेम सुरू असलेली वाहतूक पूर्णपणे मंदावली आहे. पावसाच्या सुरुवातीलाच अशी अवस्था असेल तर पुढे काय हाल होणार याची कल्पना न केलेली बरी असे लोकांचे म्हणणे आहे.