

पालघर : उन्हाळ्याच्या सुट्ट्यांनंतर सुरू झालेल्या पावसाळ्यामुळे गेल्या पाच-सहा महिन्यांपासून पालघरच्या समुद्रकिनाऱ्यांवरील पर्यटन व्यवसाय काहीसा थंडावला होता. मात्र, दिवाळी सणाच्या निमित्ताने हा मोठा खंड सरला असून, दिवाळीनंतर सरलेल्या आठवडा अखेरीसही जिल्ह्यातील पर्यटनस्थळे पर्यटकांनी तुडुंब भरून गेली होती. शुक्रवार, शनिवार आणि रविवार या सलग सुट्ट्यांमध्ये स्थानिक नागरिकांसह गुजरात आणि मुंबई उपनगरांतील पर्यटकांनी समुद्रकिनाऱ्यांवर मोठी गर्दी केल्याने किनाऱ्यांना तब्बल सहा महिन्यांनंतर पुन्हा एकदा बहर आला आहे.
पावसाळ्याच्या चार महिन्यांच्या कालावधीत समुद्राच्या उधाणामुळे आणि प्रतिकूल वातावरणामुळे किनाऱ्यांवरील व्यवसाय काहीप्रमाणात बंद होते. त्यानंतरच्या काळातही पर्यटकांची संख्या मर्यादित होती. मात्र, दिवाळीच्या सणापासून आणि विशेषतः सरलेल्या आठवडा अखेरीस पर्यटकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावल्याने व्यावसायिकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. कोकणातील समुद्रकिनाऱ्यांसोबतच पालघरच्या केळवे, डहाणू, चिंचणी, बोर्डी, अर्नाळा आणि शिरगाव या निसर्गरम्य व स्वच्छ समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांनी दोन-तीन दिवस मुक्काम ठोकून पर्यटनाचा मनमुराद आनंद लुटला.
पूर्वी प्रामुख्याने बोर्डी आणि डहाणूच्या दिशेने येणारा गुजराती पर्यटकांचा ओढा आता पालघर आणि केळवे समुद्रकिनाऱ्यांकडे अधिक वळल्याचे चित्र या आठवडा अखेरीस पाहायला मिळाले. पर्यटकांच्या या आगमनामुळे हॉटेल, लॉज आणि रिसॉर्ट व्यावसायिकांसह किनाऱ्यावर छोटा-मोठा व्यवसाय करणाऱ्या स्थानिक महिलांना पाच-सहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर चांगला रोजगार उपलब्ध झाला आहे.
केळवे येथील व्यावसायिक यांनी दिलेल्या माहितीनुसार, "गेल्या मे महिन्यातील उन्हाळी सुट्ट्यांनंतर पावसाळा आणि त्यानंतरच्या काळात पर्यटनाचा मोठा खंड (ड्राय स्पेल) गेला होता. मात्र, दिवाळीच्या दोन दिवस आधीपासून आणि या आठवडा अखेरीस किनाऱ्यालगतची सर्व हॉटेल्स पूर्णपणे आरक्षित झाली आहेत. कोणत्याही अडथळ्यांशिवाय प्रवास करता येत असल्याने पर्यटकांचा मोठा ओघ सुरू झाला आहे."
रानमेवा व साहसी खेळांचे आकर्षण
समुद्रकिनारे पुन्हा गजबजल्याने खाद्यपदार्थ आणि मनोरंजनाची मोठी रेलचेल पाहायला मिळाली. किनाऱ्यावर विक्रीस असलेला ताजा रानमेवा पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहे. आवळा, बोर, चिंच, स्टारफ्रूट (करमळ), शहाळे आणि ताडगोळे यांचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. यासोबतच विविध साहसी खेळ, उंट सफारी, घोडा सफारी, पाण्यातील राईड्स आणि लहान मुलांसाठी असलेल्या बॅटरीवरील बाईक व कारमुळे बालगोपाळांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. सायंकाळच्या वेळी स्थानिक नागरिकांनीही सहकुटुंब फेरफटका मारण्यासाठी किनाऱ्यांवर गर्दी केली होती.
आगामी काळातही व्यावसायिकांमध्ये उत्साह
आठवडा अखेर संपला असला तरी अजूनही शाळांना सुट्ट्या सुरू असल्याने पर्यटकांचा हा ओघ असाच कायम राहणार आहे. दिवाळीच्या सुट्ट्यांपासून सुरू झालेला हा पर्यटनाचा हंगाम नाताळ आणि नवीन वर्षाच्या स्वागतापर्यंत तेजीत राहील, असा विश्वास व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे. पाच-सहा महिन्यांच्या खंडानंतर पर्यटक समुद्रकिनारे, ऐतिहासिक किल्ले आणि मंदिरांना भेटी देण्यासाठी पुन्हा बाहेर पडल्याने व्यावसायिकांनीही दर्जेदार सुविधा देण्यावर भर दिला आहे.
यंदा २२ ते २६ जानेवारी दरम्यान केळवे बीच पर्यटन महोत्सव
केळवे बीच पर्यटन उद्योग विकास संघाच्या वतीने आयोजित करण्यात येणारा यंदाचा सातवा 'केळवे बीच पर्यटन महोत्सव' २२ ते २६ जानेवारी २०२७ दरम्यान केळवे येथील आदर्श विद्या मंदिर पटांगणावर सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत पार पडणार आहे. या महोत्सवात सांस्कृतिक कलादर्शन, लाईव्ह ऑर्केस्ट्रा, वस्तू बाजारपेठ, उद्योग प्रदर्शन व फूड फेस्टिव्हलचे विविध स्टॉल उभारण्यात येणार असून, दरवर्षीप्रमाणे यंदाही या महोत्सवाला मोठी गर्दी होण्याची अपेक्षा आहे.