

Arnala Transformer incident Electricity Worker Death
खानिवडे : वसईत महावितरणच्या गलाथान कारभारामुळे निष्पाप जीव जाण्याच्या घटना वसईत सुरूच आहेत. नुकताच वसई पश्चिमेस मर्सिस येथे एका तरुणाचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच विरार पश्चिमेतील अर्नाळ्यातील धसपाडा येथे रोहित्राची दुरुस्ती करण्यासाठी वरती चढलेल्या चार कर्मचाऱ्यांना काम करीत असताना विजेचा जोराचा झटका लागला. यात एकाचा मृत्यू तर तिघे जबर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी (दि.३०) सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली. यामुळे वीज वितरणाच्या गलथान कारभारावर आता संताप व्यक्त केला जात आहे. जखमी तिघांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
जयेश घरत (वय २८) असे मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे. तो नवापूर, जांभूळपाडा अर्नाळा येथील रहिवासी आहे. महावितरणच्या रोहित्रात बिघाड झाल्यामुळे चारही कर्मचारी दुरुस्तीसाठी वरच्या बाजूस चढले होते. दुरुस्ती कामा दरम्यान अचानक वीज प्रवाह सुरू झाल्यामुळे चारही कर्मचाऱ्यांना विजेचा जोरदार झटका बसला. यात तीन कर्मचारी बाहेर फेकले गेले. परंतु, घरत हा वरती अडकून पडल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेमुळे महावितरणच्या गलाथान कारभाराचा आणखी एक बळी गेल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे. सुरक्षा नियम, यंत्रसामुग्री, कर्मचाऱ्यांच्या समन्वयाचा अभाव, वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष इत्यादी अनेक बाबी या घटनेमुळे समोर आलेल्या आहेत. तसेच काम सुरू असताना बंद केलेला वीज प्रवाह अचानक या ठिकाणी कसा सुरू झाला ? हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे . याची सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे.