

कासा : मुंबई–अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील धानिवरी परिसरात शनिवारी पुन्हा एकदा भीषण अपघात घडून एका युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोघे गंभीर जखमी झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. काही दिवसांपूर्वी याच परिसरात झालेल्या भीषण अपघातात १४ जणांचा मृत्यू झाला होता. त्या घटनेची वेदना अद्याप ताजी असतानाच पुन्हा झालेल्या या दुर्घटनेमुळे महामार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, चारोटीहून धानिवरीकडे मोटारसायकलवरून घरी परतणारे तीन युवक आपल्या लेनमधून प्रवास करत होते. त्याचवेळी त्यांच्या पुढे मधल्या लेनमध्ये धावणाऱ्या आयशर टेम्पोने अचानक कोणतीही पूर्वसूचना न देता डाव्या बाजूला वळण घेतले. या अचानक झालेल्या हालचालीचा अंदाज मागून येणाऱ्या दुचाकीस्वाराला न आल्याने मोटारसायकल थेट आयशर टेम्पोच्या मागील भागावर जोरात आदळली. धडक इतकी भीषण होती की अपघातात मिथुन आजीस गायकर (वय अंदाजे १७ ते १८ वर्षे) यांचा जागीच मृत्यू झाला. तर राजू माणीक चव्हाण (वय अंदाजे २० वर्षे) आणि आशिष जयेश चव्हाण (वय अंदाजे १४ ते १५ वर्षे) हे गंभीर जखमी झाले. तिघेही धानिवरी येथील कोटबीपाडा येथील रहिवासी आहेत.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेत जखमींना कासा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर प्रकृती चिंताजनक असल्याने दोघांनाही पुढील उपचारासाठी वेदांत रुग्णालयात हलविण्यात आले.
धानिवरी परिसरात काही दिवसांपूर्वी झालेल्या भीषण अपघातात १४ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतरही या महामार्गावरील धोकादायक वाहतूक, वाहनचालकांची बेपर्वाई आणि सुरक्षिततेच्या उपाययोजनांचा अभाव यामुळे पुन्हा एक तरुण जीव गमवावा लागल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे. या महामार्गावर वारंवार होणाऱ्या अपघातांना आळा घालण्यासाठी वाहतूक विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि संबंधित प्रशासनाने तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे. या प्रकरणी कासा पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून, अपघाताचे नेमके कारण आणि संबंधित वाहनचालकाची जबाबदारी निश्चित करण्याच्या दृष्टीने पुढील तपास सुरू आहे.