

पालघर : उत्तन ते विरार अशा सागरी सेतूच्या कामाला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे पालघर जिल्ह्यातील दळणवळणाला मोठी गती येणार आहे. या प्रकल्पाचे 86 लाख 80 हजार चौरस मीटर क्षेत्र आहे. मुंबई महानगर प्राधिकरणकडून हा प्रकल्प केला जाणार आहे. मुंबई - उरण न्हावाशेवा सागरी सेतूनंतरचा हा मोठा प्रकल्प आहे.
हा सेतू समुद्रात 19 मीटर खोलीपर्यंत पायलिंगद्वारे उभारला जाणार आहे. त्यामुळे सागरी जीवाना कामाचा धोका पोहोचणार नाही, असे मुंबई महानगर प्राधिकरणने सांगितले आहे. या प्रकल्पाला सीआझेडची परवानगी मिळाल्याने प्रकल्पाचे काम गतिमान होऊ शकणार आहे. हा प्रकल्प करताना सीआरझेड विभागाने खारफुटी वन्यजीव आणि सागरी जीवाना धोका पोहोचणार नाहीत अशा सूचना दिल्या आहेत. हा प्रकल्प उभारताना जीवशास्त्रीय अभ्यासही करण्यात आला आहे. चेन्नईच्या इन्स्टिट्यूट ऑफ रिमोट सेन्सिगल या संस्थेने उपग्रहाद्वारे अभ्यास करून पर्यावरणीय अहवाल दिल्यानंतर या आधारावर सीआरझेडने परवानगी दिली आहे.
या प्रकल्पामध्ये उन्नत जोडरस्त्यासाठी 8.71 हेक्टर जमीन आणि विरारला जोडण्यासाठी 6. 68 हेक्टर जमीन संपादित केली जाईल. या प्रकल्पात झाडांची तोड होणार असल्याने 52 हजार नवीन झाडे लावली जाणार आहेत. एकूण 420 झाडांची तोड प्रकल्पात करावी लागेल. तर नवे वनीकरण पाच पट अधिक केले जाईल. या प्रकल्पात 5.20 हेक्टर क्षेत्र तुंगारेश्वर वन्यजीव अभयारण्याच्या संवेदनशील भागाशी जोडलेले आहे. या प्रकल्पासाठी 1. 67 हेक्टर क्षेत्रातील झाडे तोडावी लागणार आहेत. या प्रकल्पाचा खर्च 52 हजार कोटी येणार आहे.
प्रकल्प पूर्ण करण्यासाठी पुढील पाच वर्षाचा कालावधी लागू शकतो. या प्रकल्पामुळे भरती प्रक्रियेवर कोणताही परिणाम होणार नाही. खोदकामावेळी 105 डेसिबलच्या वर आवाज होणार नाही. असेही प्रकल्प अहवालात नमूद करण्यात आले आहे. मुंबई उरण अटल सेतू प्रकल्पानंतरचा हा मोठा प्रकल्प असणार आहे. पालघर जिल्ह्यात होणार्या वाढवण बंदरानंतर उत्तन पर्यंतची दळणवळण कार्यप्रणाली गतिमान करणारा हा प्रकल्प असणार आहे.