

हनिफ शेख
पालघर: जिल्ह्यातील प्रसिद्ध तारपा वादक आणि अनेक पुरस्काराने सन्मानित असलेल्या भिकल्या लाडक्या धिंडा यांना पद्मश्री पुरस्कार घोषित झाल्याने पालघर जिल्ह्यात आनंदाचे वातावरण आहे अनेक पुरस्काराने सन्मानित असलेल्या भिकल्या धिंडा यांना अतिशय प्रतिष्ठेचा असा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांनी आजवर जपलेल्या या कलेचा एक प्रकारेच हा सन्मान असल्याचे बोलले जात आहे.
घरातच तारपा वादन वर्षानुवर्षे चालत असल्यामुळे त्यांना लहानपणापासूनच तारपा बाजूने आवड होती लहानपणी वयाच्या दहाव्या वर्षापासून ते जंगलात गुरेढोरे चरावयास घेऊन जात असत.त्यावेळी ते आपल्या सोबत तारपा वाद्य घेऊन जात असत भिकल्या दिंडा यांच्या घराण्यात साधारण दीडशे वर्षापासून तारपा वादाची परंपरा आहे त्यांचे आजोबा नवसु धाकल्या धिंडा तारपा वादन करत असत त्यानंतर त्यांचे वडील लाडक्या धाकल्या धिंडा हे सुद्धा तारपा वाजवित असत.
यासाठी त्यांना आजवर अनेक पुरस्कार मिळालेले आहेत यामध्ये तारपा शिरोमणी पदवी सांस्कृतिक सेनानी सन्मान राष्ट्रीय संगीत नृत्य आणि नाटक अकादमी नवी दिल्ली कडून संगीत नाटक अकादमी पुरस्कार 2022 देखील त्यांना प्राप्त झालेला आहे याशिवाय 2023 मध्ये त्यांना पालघर भूषण आणि पालघर जिल्हा परिषदेचे ब्रँड दूत म्हणून सुद्धा त्यांची निवड करण्यात आली होती याशिवाय देशभर होणाऱ्या विविध कला संस्कृती संदर्भातील अनेक कार्यक्रमात धिंडा यांचा सन्मान करण्यात येतो.
याशिवाय त्यांच्या तारपा वादनाचे भव्य दिव्य कार्यक्रम सुद्धा होत असतात. भिकल्या धिंडा यांनी एका वाद्यासाठी संपूर्ण आयुष्य खर्ची घातली आहे खरं तर धाकल्या हे श्वास घेणारा तारपा आमचा देव आहे असेच म्हणतात. जव्हार तालुक्यातील वाळवंडा या गावातील रहतात.सुरुवातीला त्यांच्याकडे रोजगाराचे साधन उपलब्ध नव्हते आपल्या कलेच्या जीवावर उदरनिर्वाह करण्यासाठी ते तारपा घेऊन विविध तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी गेले सुरुवातीला त्यांच्या या कलेकडे दुर्लक्ष झाले मात्र आज ते या तारपा वादक म्हणून जगप्रसिद्ध आहेत.
खरंतर आज भव्य दिव्य स्टुडिओमध्ये काम करणाऱ्या अनेक कलावंतांना किंमत आहे मात्र घशाला कोरड पाडून शिरात आणून छातीचा भाता करून जीवाच्या आकांताने तारपा वाजवणाऱ्या अशा अनेक कलाकाराकडे सरकारचे नेहमी दुर्लक्ष होत असते मात्र आज धिंडा यांना जाहीर झालेल्या या पद्म पुरस्कारामुळे अशा अनेक तारपा वादकांमध्ये एक आशेचा किरण नक्कीच निर्माण झाला आहे. आदिवासी भागात असे अनेक तारपा वादक आपल्या संस्कृतीचे जतन संवर्धन करत आहेत अशा अनेक कलाकारांचा सन्मान आणि रोजी रोटी साठी मानधन देखील शासनाने चालू करणे आवश्यक आहे.