

खानिवडे : वसई तालुक्यात जूचंद्र, होलिका दहनाच्यावेळी स्थानिक परंपरेचे होतेय दर्शन. खानिवडे, अर्नाळा, कामण, पोमण, नागले, मालजीपाडा, गौराईपाडा आदी भागामधील अनेक गावांत आजही एक गाव एक होळीची परंपरा कायम आहे. आजही या गावांमध्ये परंपरागत एकाच ठिकाणी होळी दहनाचा कार्यक्रम वर्षानुवर्षांच्या परंपरेने संपन्न होत असून संपूर्ण गाव यासाठी एकत्र येतो. ही परंपरा पूर्वापार आहे.
यामध्ये खानिवडे गावांत मागील वर्षीच्या होळीपासून आताच्या होळीपर्यंत जे गावचे नवीन जावई झाले आहेत अश्या गावाच्या जावयांचा मानपान, सन्मान होळीच्या कार्यक्रमा दरम्यान जाहीररीत्या केला जातो. एक गाव एक होळीची परंपरा असलेल्या या गावात वाजत गाजत होळी आणल्यानंतर ती रचण्यात येते. व होलिका दहनाचा कार्यक्रम मध्यरात्री १२.३० वाजता केला जातो. याअगोदर रात्री ९ ते १२ या दरम्यान येथे अनेक सांस्कृतिक, पारंपरिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.
उद्धेश हा कि, गावाच्या सांस्कृतिक परंपरेची नवीन पिढीला आठवण करून देणारे कार्यक्रम गावातीलच कलाकारांकडून सादर केले जाता. यामध्ये आगरी, कोळी, आदिवासी व इतर गीते, नृत्ये, गावपण जपणाऱ्या नाटिका, पारंपरिक वेशभूषा असे अनेकविध कार्यक्रम सादर केले जातात. यावेळी अख्ख गावच नव्हे तर सभोवतालच्या परिसरातील हजारो नागरिक जात पंथ भेद विसरून या कार्यक्रमाला उपस्थित राहतात.
होळी दहनासाठी गावचे प्रतिष्ठित, प्रौढ व गावपाटील यांना मान दिला जातो. या उत्सवासाठी संपूर्ण गावातील महिला पुरुष यांच्यासह लहानगे नवीन कपडे परिधान करून खूप मोठ्या प्रमाणात उपस्थित असतात. दहनाच्या वेळी होळीला फेर घालताना गावातील गृहिणींनी खास होळीसाठी तयार केलेल्या पुरणपोळ्या, तांदळाच्या पापड्या, नारळ व होळीनिमित्त भरवण्यात येणाऱ्या यात्रेतील खरेदी केलेल्या उसाचे होळीत समर्पण केले जाते. त्यानंतर गुलाल उधळून होळी उत्सव सुरु केला जातो.
खानिवडे गावा सारखी इतरही गावामध्ये एक गाव एक होळी हि परंपरा कमी अधिक प्रमाणात आजही असली तरी अनेक गावात गावांतील अंतर्गत गटबाजीमुळे परंपरा मोडीत निघण्याच्या मार्गावर आहे. दरम्यान गावातील जुने जाणते वृद्ध कुंठित मनाने परंपरा संपत असल्याची व्यथा मांडत आहेत. तसेच साऱ्या गावाने एक गाव एक होळी उत्सव साजरा करून गावचे ममत्व जपण्याची नवीन पिढीकडे इच्छा व्यक्त करत आहेत.