

पालघर : आठवडाभरापूर्वी क्रेनच्या धडकेने कोसळलेल्या मस्तान नाका उड्डाणपुलाची दुरुस्ती करण्यात आली आहे. कोसळलेल्या भागात सिमेंट काँक्रीट भरल्यानंतर उड्डाणपुलाच्या भिंतीला सिमेंट काँक्रीटचे ग्राउटिंग करण्यात आले आहे. गेल्या रविवारी (दि.16) मध्यरात्री उड्डाणपुलाच्या भरावाच्या आधारासाठी असलेल्या सिमेंटच्या विटांच्या भिंतीला क्रेन धडकल्याने काही भाग कोसळून पुलाची पडझड झाली होती.
आठवडाभरापूर्वी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास पालघर-मनोर रस्त्यामार्गे क्रेन वाहतूक करणारा ट्रेलर गुजरात वहिनीवर वळण घेत असताना ट्रेलरवरील क्रेनच्या पुढच्या भागाची धडक उड्डाणपुलाला लागली होती. धडकेमुळे उड्डाणपुलाच्या भिंतीच्या काही भागाची पडझड झाली होती. दरम्यान उड्डाणपुलाला धडक देणाऱ्या ट्रेलर चालका विरोधात मनोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रस्त्यांच्या नियमांकडे दुर्लक्ष करून निष्काळजीपणे वाहन चालवून मस्तान नाका उड्डाणपुलाच्या भिंतीला ठोकर मारून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्या प्रकरणी भारतीय न्याय संहितेचे कलम २८१, ३४२ (४) सह सार्वजनिक संपत्तीस हानीकारक प्रतिबंध अधिनियम १९८४चे कलम ३ (२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. क्रेन वाहतूक करणाऱ्या ट्रेलर (४६ ०८८६) चालकाचे नाव निष्पन्न झाले नाही. निर्मल इन्फ्रा कंपनीचे अभियंता अमन त्रिपाठी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई-अहमदाबाद महामार्गाच्या सहा पदरीकरणाच्या कामामुळे महामार्गावरील वाहनांच्या वेग मयदित वाढ झाल्याने महामार्गावरील क्रॉसिंगच्या ठिकाणी होणारे अपघात रोखण्यासाठी उड्डाणपुलांची उभारणी करण्यात आली होती. मस्तान नाका येथे पालघर-मनोर रस्त्यावर क्रॉसिंग असल्यामुळे, याठिकाणी अपघातांची संख्या मोठी होती. त्यामुळे सुमारे पंधरा वर्षांपूर्वी मस्तान नाका येथे उड्डाणपूल उभारण्यात आला होता. उड्डाणपुलाच्या दोन पिलर दरम्यानच्या गर्डर टाकल्यानंतर जोड रस्ता निर्मितीसाठी माती मुरूमाचा भराव करण्यात आला होता. जोडरस्त्याच्या भरावाला आधार देण्यासाठी सिमेंट काँक्रीटच्या विटा लावून भिंत उभारण्यात आली आहे.
उड्डाणपुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी
क्रेनच्या धडकेमुळे पडझड झालेल्या मस्तान नाका उड्डाणपुलाच्या सुरक्षितते बाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. उड्डाणपुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी केली जात आहे. मस्तान नाका उड्डाणपुलाच्या खालच्या भागात वाहनचालक, अन्नपदार्थ विक्रेते, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांची मोठी वर्दळ असते. मध्यरात्रीच्या वेळी क्रेनच्या धडकेने उड्डाणपुलाचा भाग कोसळला. त्यामुळे कोणालाही दुखापत झाली नाही.