

खोडाळा : दीपक गायकवाड
मोखाडा तालुका हा धबधब्यांच माहेरघर आहे. शंभराहुन अधिक लहान मोठे धबधबे पर्यटकांना दरवर्षी खुणावत असतात. असेच दोन विलोभणिय पण दुर्लक्षित राहिलेले धबधबे डोल्हारा नजिक तळ ठोकून आहेत. परंतू पर्यटकांना त्याची जाणीवच नसल्याने हौशी पर्यटक या रमनीय नजर मेजवानीला मुकलेले आहेत. त्याचाच हा अल्प परिचय वर्षा सहलीला आसूसलेल्या पर्यटकांना खुल्या दिलाने करून देत आहे.
डोल्हारा पासून अगदी हाकेच्या अंतरावर उबडा कपारा हा बारमाही वाहणारा निर्धाक धबधबा पर्यटकांपासून आजही दुर्लक्षित राहिलेला आहे. काळ मांडवी, दाबोसा, एव्हढेच काय तर अशोका धबधब्या इतकीही धोका दायक परिस्थिती या ठिकाणी नाही. त्यामुळे हौशी पर्यटकांना तब्येत सांभाळून या धबधब्याचा मनमुराद आनंद लुटता येणार आहे. खोडाळा - मोखाडा राज्य मार्गावरील देवबांधचा घाट चढून वर आलं की डोल्हारा गावाच्या मागेच खोडाळा कडून जाताना उजव्या हाताला कोथळी धबधबा आहे. हाही धबधबा तसा धोकाधायक नाही परंतु या ठिकाणी पोहचणे मात्र कमालीचे, जीकिरीचे आणि तसदीचे आहे. प्रत्यक्ष जागेवर पोहचायला जिगरबाज काळजाचे धाडस लागणार आहे
परंतु या दोन्हीही धबधब्यांचा विशेष गवगवा नसल्यामुळे पर्यटकांच्या नजरेआड राहिलेले आहेत. या धबधब्यांच्या संवर्धनाची आणि रहदारीच्या मार्गाची पर्यटण विभागाने सुलभता केल्यास पर्यटकांना वर्षा सहलीचा बिनधास्त आनंद उठविता येणार आहे.
मुंबई कडून येणाऱ्या पर्यटकांनी कसारा रेल्वे स्थानक येथून खोडाळा येथे येऊन पुढे देवबांध येथील प्रसिद्ध गणेशाचे दर्शन घेऊन डोल्हारा कडे प्रस्थान करायचे. अगदी पायीच निसर्ग सौंदर्य निरखत गेले तरी फक्त १५ मिनिटांत कोथळी धबधबा जवळ करता येतो. तेथूनच पुढे हमरस्त्याने डोल्हारा येथे पोहोचलात की अगदी हाकेच्या अंतरावरच उपरा धबधबा आहे. मुंबई किंवा नाशिक कुठूनही आलात तरी खोडाळा येथून पुढे मार्गस्थ होणे सोयीचे आहे. चला तर मग कधी येताय...?
उबरा कपारा धबधबा
कोथळी धबधबा