Vaitarna river energy project : मध्य वैतरणावर 100 मेगावॉटच्या जलविद्युत प्रकल्पाला मान्यता

प्रकल्पातून दरवर्षी 208 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती होणार
Vaitarna river energy project
मध्य वैतरणावर 100 मेगावॉटच्या जलविद्युत प्रकल्पाला मान्यता pudhari photo
Published on
Updated on

पालघर : हनिफ शेख

पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील मध्य वैतरणा धरणामध्ये 100 मेगावॉटच्या संकरित ऊर्जा निर्मितीसाठी अर्थात हायड्रो पॉवर प्लांटकरता प्रथमतः प्रकल्पाला मान्यता मिळाली आहे. या प्रकल्पासाठी 4.90 हेक्टर संरक्षित वन जमीन पुनर्वळती करण्यासाठी राज्य सरकारने मान्यता दिली आहे. या वीज निर्मिती प्रकल्पातून दरवर्षी 208 दशलक्ष युनिटच्या जवळपास वीज निर्मिती केली जाणार आहे. त्यामुळे हरित ऊर्जेच्या दृष्टीने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे. धरणावर वीज निर्मिती प्रकल्प उभा करणारी मुंबई महापालिका ही पहिलीच महापालिका असल्याचा दावा केला जात आहे.

मोखाडा तालुक्यात मध्य वैतरणा धरण असून या धरणामधून मुंबईला पाणीपुरवठा केला जातो. मुंबई महापालिकेच्या अखत्यारीत हे धरण आहे. कोचाळे गावामध्ये 102 मीटर उंचीचे व 565 मीटर लांबीचे हे धरण 2014 मध्ये पूर्णत्वास आले. या धरणाला हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशय असे नामकरण करण्यात आले. धरणावर जलविद्युत निर्मिती करण्यासाठी 2019 मध्ये मुंबई महापालिकेने मान्यता दिली होती.

सल्लागारांची नियुक्ती केल्यानंतर वापरा आणि हस्तांतरित करा या तत्त्वावर जलविद्युत निर्मिती व सौर ऊर्जा निर्मिती करावी असा सल्ला सल्लागारांनी त्यावेळी दिला. त्यानुसार या प्रकल्पाच्या उभारणीसाठी निविदा जाहीर करण्यात आल्या आहेत. पंचवीस वर्षासाठी केवळ चार रुपये 75 पैसे प्रति युनिट दराने वापरलेल्या युनिटसाठी पैसे देण्यात येणार असून महापालिकेकडून कोणतीही गुंतवणूक त्यासाठी केली जाणार नाही.

या प्रकल्पामध्ये मोखाडा तालुक्यातील 4.90 हेक्टर संरक्षित वन जमीन बाधित होणार आहे. त्यासाठी 21 जुलैला राज्याच्या वनविभागाने वन जमिनीच्या पुनर्वळतीकरणाला मान्यता दिली. ही परवानगी केंद्र शासनाच्या वनमंत्रालयाशी सातत्यपूर्ण पाठपुरावा केल्यानंतर मिळाली आहे. वन जमिनीकरता एप्रिल 2025 ला केंद्राची अंतिम मंजुरी मिळाली होती.

जलाशय प्रकल्पमध्ये दोन टप्प्यांत वीज निर्मिती केली जाणार आहे. 20 मेगावॅट क्षमतेचा जलविद्युत प्रकल्प तर 80 मेगावॅट क्षमतेचा तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प असा एकूण 100 मेगावॅट क्षमतेचा हा प्रकल्प आहे. या वीजप्रकल्पातून निर्माण केली जाणारी वीज महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लिमिटेडच्या इगतपुरी ग्रीडपर्यंत पोचवली जाणार आहे. तिथून ती वितरित केली जाईल.

यासाठी मध्य वैतरणा ते नाशिक इगतपुरी येथे 13 किलोमीटर लांबीची स्वतंत्रपणे वीजवहन वाहिनी उभारण्यात येणार आहे. लवकरच या वीज निर्मिती प्रकल्पाच्या प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे धरणातून वीज निर्मिती करण्याच्या क्षेत्रात मुंबई महानगरपालिका अव्वल स्थानी येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. भविष्यात मध्य वैतरणा धरणासारखेच इतर जलाशयांवर असे प्रकल्प विकसित करण्याचा मानस महानगरपालिकेने व्यक्त केला आहे.

  • मोखाडा तालुक्यातील कोचाळे गावामध्ये गट क्रमांक 224 - 225 मधील सर्वे क्रमांक 76- 77 या संरक्षित वन क्षेत्राची एकूण 4.90 हेक्टर जमीन वळती करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या जमिनीवर बांधकाम अर्थात पावर हाऊस, बोगदा, स्विच यार्ड, गोदाम, हायब्रीड स्विच यार्ड, कार्यालय रस्ता व डम्पिंग क्षेत्र अशी कामे केली जाणार आहेत. तसा शासन निर्णय 21 जुलै 2025 ला महसूल वने मंत्रालयामार्फत काढण्यात आला आहे. गट क्रमांक 224 आणि 225 मधील ही संरक्षित वन जमीन 20 मेगावॅट क्षमतेच्या संकरित ऊर्जा प्रकल्पासाठी वन अधिनियमअंतर्गत पुनर्वळती करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news