वाडा : पिंजाळ नदीच्या किनाऱ्यावर मलवाड़ा ग्रामपंचायत हद्दीत गावाचे नाव उभारून नुकताच सेल्फी पॉइंट बनविण्यात आला होता. अज्ञात समाजकंटकांकडून या नावाची तोडफोड करण्यात आली असुन नदीकिनारी रात्रीच्या सुमारास बसणाऱ्या मद्यपीचे हे कृत्य असावे असा ग्रामस्थांचा संशय आहे. विक्रमगड पोलिसांत या विरोधात तक्रार नोंदविण्यात येणार असल्याचे ग्रामस्थ कमलाकर भोईर यांनी सांगितले.
पिंजाळ नदीच्या किनाऱ्यावर शनीमंदीर, हातोबा देवस्थान अशी प्रसिद्ध देवस्थान असुन हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतं असतात. उंच पुल व दगडांमधून खळखळ वाहून वाट काढणारे पाणी पर्यटकांना आकर्षित करीत असतात, मलवाडा ग्रामस्थांनी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी नदीच्या काठी 'आम्ही मलवाडकर' असे नाव उभारले होते. पर्यटकांसाठी हे आकर्षण बनले असुन अनेकांनी येथे सेल्फी घेऊन पर्यटनाचा आनंद देखील घेतला होता.
रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी या नावाचे नुकसान केल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त करीत कारवाईची मागणी केली आहे. नदीच्या किनारी रात्रीच्या अंधारात दारू पिणाऱ्या तळीरामांचा उच्छाद दिवसेंदिवस वाढतं असुन पवित्र हातोबा देवस्थानाला देखील यामुळे गालबोट लावले जात आहे असे स्थानिकांचे म्हणणे आहे. पर्यटकांच्या व निसर्ग संपदेवर घाला घालणाऱ्या मद्यपींचा पोलिसांनी बंदोबस्त करावा अशी मागणी लोकांनी केली आहे.