

तलासरी : सुरेश वळवी
दापचरी दुग्ध प्रकल्पाने सन 1974 मध्ये कुर्झे येथे 39 दशलक्ष घनमीटर क्षमतेचे धरण उभारण्यात आले होते.हे धरण 54 वर्षापेक्षा जुने असून सिमेंट व मातीचे बांधण्यात आले आहे. दुग्ध विकास विभागाचे एकमेव्य धरण सध्या पाटबंधारे व जल संधारणा विभाग मनोर यांच्या अंतर्गत देण्यात आले आहे. परंतु धरणावर गेल्या चार वर्षापासून वीज पुरवठा खंडित करण्यात आले आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने धरणाला धोका वाढला आहे. तसेच या धरणाची योग्य पद्धतीने देखभाल दुरुस्ती होत नसल्याने तसेच धरणावरील दगडी थर विखुरले गेले असून लहान झाडे झुडपे वाढल्याने धरण धोकादायक स्थितीत आहे.
धरणावर विद्युत व्यवस्था कार्यरत नसून धरण क्षेत्रात होणार्या दमदार पावसाने धरणातील पाण्याची पातळी वाढत आहे त्याचप्रमाणे या भागात होणार्या भूकंपाच्या धोक्याच्या अनुषंगाने धरणाला धोका वाढला आहे.
तलासरी तालुक्याला लागून डहाणू तालुक्यामध्ये 1964 मध्ये दापचरी येथे आशिया खंडातील सर्वात मोठ्या दूध प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली होती. परंतु शासकीय स्तरावरील अनास्था, नियोजनशून्य कारभार यामुळे हा प्रकल्प अयशस्वी झाला आहे. दुग्ध प्रकल्पाच्या पाण्याची गरज भागविण्यासाठी कुर्झे येथे 1967 साली 39 दशलक्ष घनमीटर पाणी साठा असलेल्या धरणाचे काम सुरू केले व 1974 मध्ये हे धरण बांधून पूर्ण झाले होते. परंतु आज मितीला हे धरण वीजपुरवठा नसणे, पुरेशी सुरक्षा यंत्रणा नसणे, देखभाल आणि किरकोळ दुरुस्त्या न होणे अशा विविध समस्यांच्या विळख्यात सापडले आहे.
पालघर जिल्ह्यात सध्या जोरदार पाऊस चालू आहे.त्यामुळे अनेक धरणं पाण्याने तुडुंब भरत आहेत. तर राज्यात काही ठिकाणी जुनी मातीची धरण फुटण्याचे प्रकार सुद्धा होत आहेत. तलासरी तालुक्यातील कुर्झे येथील माती आणि सिमेंट काँक्रीट अशा मिश्र पद्धतीने धरण बांधलेले आहे. या धरणाला ज्या ठिकाणी दरवाजे आहेत त्या ठिकाणी काँक्रीट चे बांधकाम आहे तर, इतर ठिकाणी मातीचा भराव टाकून दगड धोंडे रचून बांधले आहे. या धरणाची लांबी साधारणपणे 2500 मीटर पेक्षा जास्त असून उंची 23 मीटर च्या आसपास आहे.
साधारणपणे 54 वर्षे जुने हे मातीचे धरण पाण्याच्या दाबामुळे किंवा या परिसरात होणार्या भूकंपाच्या धक्क्यांमुळे फुटले तर तलासरी आणि डहाणू तालुक्यातील काही गावे बाधित होऊ शकतात. दापचरी दुग्ध प्रकल्पाच्या कुर्झे येथील धरणाची अनेक वर्षांपासून डागडुजी दुरुस्ती केलेली नाही. दरवर्षी फक्त दरवाज्याच्या कामाची दुरुस्ती केली जाते. या धरणाला तीन दरवाजे असल्याने धरण फुटण्याची शक्यता कमी आहे, परंतु अनेक ठिकाणी मातीच्या भराववरील दगडी थर घसरलेले आहेत. तर अनेक ठिकाणी लहानलहान झाडे उगवली आहेत त्यामुळे या ठिकाणी धरण भरून पाण्याचा दाब निर्माण झाला किंवा आशा स्थितीत भूकंपाचा जोरदार धक्का बसला तर धरण फुटूही शकते.
या ठिकाणचा वीजपुरवठ्याची यंत्रणा साधारण पूर्ण बंद पडली आहे. त्यामुळे या धरणावर गेल्या चार वर्षापासून वीजपुरवठा होत नाही. धरणाच्या सुरक्षिततेसाठी या ठिकाणी गेल्या महिन्या सुरक्षा रक्षक नेमले आहेत मात्र त्यांनाही सुरक्षेची साधने उपलब्ध करून दिली जात नाही तसेच त्यांना ड्रेस कोट दिले गेले नाही. सीसीटीव्ही यंत्रणा उपलब्ध नाही. त्यामुळे धरणावर कोणता अनुचित प्रकार घडला किंवा धरणाला धोका झाला तर काय करावे असा प्रश्न उपस्थित होत आहे.
एकंदरीत विचार केला तर वीज नाही, सीसीटीव्ही यंत्रणा नाही, महिनाभरापूवी नेमलेले मोजके सुरक्षा रक्षक तसेच धरण परिसरात होणारे भूकंप यामुळे हे धरण धोकादायक स्थितीत असल्याची भावना धरण परिसरातील रहिवाशी व्यक्त करत आहेत. तरी शासनाने या धरणाच्या मातीच्या भरावाची दुरुस्ती करावी,धरणावरील वीजपुरवठा सुरू करावा, धरणाच्या सुरक्षिततेसाठी पुरेसे सुरक्षारक्षक नेमवावेत अशी मागणी धरण परिसरातील रहिवाशी करत आहेत.
साधारण महिना भरापूर्वी जलसंधारण विभागाकडे कुर्झे धरण वर्ग करण्यात आले आहे. महत्त्वाचे धरणाचे गेट उघडण्यासाठी जनरेटर लावण्यात आले आहे. विजेसह इतर सुविधा उपलब्ध करण्यासाठी वरिष्ठ पातळीवर मागणी करण्यात येईल. धरण सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सुरक्षितता समितीकडून तपासणी करून घेतली जाईल.
प्रवीण भुसारे, कनिष्ठ अभियंता, जलसंधारण विभाग, मनोर