पालघर : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या दुर्लक्षामुळे व्हाईट टॉपिंगच्या कामानंतरही खड्ड्यांमुळे महामार्गाची दुरवस्था झाली आहे. उड्डाणपुलांच्या अपूर्ण कामांमुळे होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे वाहनचालकांसह स्थानिकांची गैरसोय होत आहे. स्थानिकांकडून टोल वसुली तसेच वाहनचालकांना सुविधा उपलब्ध करून दिल्या जात नसताना महामार्गावर टोल वसुली विरोधात आमदार विलास तरे यांनी आक्रमक भूमिका घेत रविवारी सायंकाळी खानीवडे टोल नाक्यावरील टोल वसुली बंद पाडली होती.
खानिवडे टोल नाक्यावर दररोज वाहनांच्या रांगा लागत असल्यामुळे वाहनचालकांसह प्रवाशी आणि रुग्णांची गैरसोय होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार विलास तरे यांनी रविवारी सायंकाळी दोन तास टोल नाक्यावर थांबून टोल वसुली बंद पाडली होती. मी लोकप्रतिनिधी असून जनतेच्या वेदना समजून घेतल्या पाहिजेत, मी ते माझ्या कर्तव्याचा भाग समजतो, असे सांगत त्यांनी संबंधित अधिकार्यांना चांगलेच फैलावर घेतले.
ससूनवघर ते आच्छाड दरम्यानचा 121 किलोमीटर अंतराच्या महामार्गाच्या दोन्ही वाहिन्यांवर पडलेले मृत्यूचे सापळे बनले आहेत. रस्त्यांमुळे वर्षभरात 179 निरपराध नागरिकांनी जीव गमावला आहे. बळी अपघाताचे नसून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या दुर्लक्षाचे आहेत. भरमसाठ टोल वसूल करून देखभाल दुरुस्तीअभावी महामार्ग सुस्थितीत ठेवण्यात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला अपयश आल्याचा आरोप विलास तरे यांनी केला.
टोल नाक्यावर दहा मिनिटांपेक्षा अधिक वेळ लागल्यास टोल शुल्क माफ करण्याचा नियम असताना रहावे लागणे अन्यायकारक असल्याचे आमदार तरे सांगितले.