

खानिवडे : 2010 चा प्रस्ताव, तर 2014ची मंजुरी मिळालेल्या बहुप्रतिक्षित खानिवडे रुग्णालयाचे काम कासवगतीने सुरू आहे. मागील दहा वर्षांपासून रखडलेल्या खानिवडे येथील ग्रामीण रुग्णालयाच्या कामाला जानेवारी महिन्यात सुरुवात करण्यात आली होती. मात्र सुरू असलेले काम हे अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे. आतापर्यंत केवळ 30 ते 35 टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे हे रुग्णालय पूर्ण होण्यास विलंब होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर अपघात घडल्यास जखमींना व आजूबाजूच्या गाव पाड्यात राहणार्या नागरिकांना वैद्यकीय उपचार मिळविण्यासाठी वसई विरार किंवा त्याहून अधिक उपचारांसाठी लांब पल्ल्यातील मुंबई ठाण्यात धाव घ्यावी लागते.यात वाहतूक कोंडीच्या अडसरामुळे दवाखान्यात पोहचताना चांगलीच कसरत करावी लागते. अशा नागरिकांना तातडीने वैद्यकीय सेवा उपलब्ध होण्यासाठी नवसंजीवनी ठरणारे महामार्गावरील जवळचे रुग्णालयात म्हणून होऊ घातलेल्या खानिवडे रुग्णालयाच्या पुर्ततेकडे सार्यांचे लक्ष लागले आहे.
2014 मध्ये महामार्गावरील खानिवडे येथे 30 खाटांचे ग्रामीण रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी सर्व्हे क्रमांक 148 व 162 मधील 0.99 हेक्टर इतकी जागा ही निश्चित करण्यात आली होती. मात्र या रुग्णालयाच्या कामात वनविभागाच्या जागेचा हस्तांतरण प्रश्न, आराखड्यातील बदल, प्रशासकीय मंजुरी साठी झालेला विलंब अशा अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. दहा वर्षे या रुग्णालयाचे काम रखडले होते. जानेवारीमध्ये बांधकामाच्या आराखड्याच्या कामाला प्रशासकीय मान्यता मिळताच निविदा प्रक्रिया पूर्ण करून कामाला सुरुवात केली होती.
रुग्णालयात उभारणीचे काम सुरुच आहे. पावसामुळे कामात अडथळे निर्माण झाले होते. आता पावसाळा संपताच त्यांचे दिलेल्या वेळेत पूर्ण करवून घेण्यासाठी प्रयत्न केले जातील.
संजय यादव, सार्वजनिक बांधकाम विभाग उपअभियंता