

मोखाडा : जव्हार तालुक्यातील नांदगाव ग्रामपंचायत मध्ये येणार्या राजेवाडी या पाड्यात गॅस्ट्रोची साथ आली असून गॅस्ट्रोमुळे चिंतू गोंड ( 55) आणि अनिता गांगड (45) या दोन व्यक्तींचा मृत्यू झाला असून या घटनेमुळे परिसरात भीतीची वातावरण असून आजही तब्बल 14 रुग्ण उपचार घेत असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात येत आहे.
पावसाळा सुरू झाला की विहिरींवर अवलंबून असलेल्या अनेक गावांत दूषित पाण्यामुळे साथीचे रोग पसरत असतात असे असताना मान्सून पूर्व तयारी म्हणून मग आरोग्य विभाग नेमकी कोणती तयारी करते हा संशोधनाचा भाग असून सध्या ही साथ आटोक्यात आणण्यासाठी जव्हार आरोग्य विभाग प्रयत्नशील आहे मात्र या साथीमुळे दोन नागरिकांना आपला जीव गमवावा लागल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
दोन दिवसांपूर्वी लोकांना अगोदर जुलाब उलटी व्हायला लागली मात्र याची तीव्रता वाढत जाऊन अनेक नागरिकांना उपचारासाठी जव्हार कुटीर रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र नांदगाव याठिकाणी दाखल करण्यात आले यामधील एकाचा जव्हार रुग्णालयात तर एकाचा राहत्या घरी मृत्यू झाल्याची माहिती समोर येत असून सध्या 14 रुग्ण उपचार घेत असून यांची संख्या कमी अधिक होण्याची चिन्हे आहेत.
जव्हार पासून 20 किमी च्या आसपास असलेल्या नांदगाव ग्रामपंचायत मध्ये हे गावं येते. गेल्या वर्षाहून अधिक काळापासून याठिकाणी नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे यासाठी जलजीवन योजनेचे काम हाती घेण्यात आले आहे मात्र ते अद्याप पर्यंत पूर्ण न झाल्याने येथील लोकांना विहिरीच्या पाण्यावर अवलंबून रहावे लागत आहे. मात्र पडणारा पाऊस, अस्वच्छता, उताराच्या मार्गाने वाहत जाणारे नाल्याचे पाणी यामुळे विहिरीतील पाणी दूषित होते. त्यातूनच हा प्रकार झाल्याचे बोलले जात आहे.
एकूणच जव्हार मोखाडा सारख्या दुर्गम भागातील गाव पाडे आजही विहिरीच्या पाण्यावर अवलंबून असून पावसाळ्यात साथीच्या रोगांची शक्यता दाट आहे. यामुळे मान्सून पूर्व तयारी केवळ कागदावर न राहता प्रत्यक्षात उतरणे गरजेची असून अन्यथा कधी नदीत वाहून जावून, कधी गरोदर मातामृत्यू,बाल मृत्यू अशा अनेक कारणांसाठी होणार्या मृत्यू मुळे आदिवासीचे जीव स्वस्त झालेत काय असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी.आदिवासींना आरोग्यदायी जीवन ही सरकारी यंत्रणा देणार आहे की नाही हा खरा प्रश्न आहे.जिल्ह्यातून बुलेट ट्रेन जाणार आहे दुसरीकडे आमचा आदिवासी किड्यां मुंग्याप्रमाणे मरत आहे हे कोणत्या प्रगतीचे द्योतक आहे ?
विनोद निकोले, आमदार - डहाणू विधानसभा
आम्ही दोन दिवसांपासून गावात सर्वे करीत आहोत जिल्हा आरोग्य अधिकारी यांनीही येथे भेट देऊन पाहणी केली आहे दोन गॅस्ट्रो संशयित रुग्ण दगावले आहेत बाकी रुग्णांची प्रकृती स्थिर आहे तालुका आरोग्य विभाग आणि ग्रामीण रुग्णालय या वर योग्य तो उपाययोजना करीत आहे. -
डॉ किरण पाटील , तालुका आरोग्य अधिकारी, जव्हार