

जव्हार: “नियम कागदावर आणि मनस्ताप ग्राहकांच्या नशिबी”, अशी काहीशी परिस्थिती सध्या जव्हार शहरात पाहायला मिळत आहे. गॅस वितरण आदेशानुसार नोंदणीकृत पत्त्यावर होम डिलिव्हरी देणे बंधनकारक असतानाही, स्थानिक गॅस एजन्सीकडून ग्राहकांना चक्क एजन्सीवर बोलावून सिलिंडर नेण्यास भाग पाडले जात आहे. विशेष म्हणजे, या गंभीर प्रकाराकडे स्थानिक पुरवठा विभाग आणि तहसीलदार कार्यालय सोयीस्कर दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.
ग्राहक संरक्षण कायदा 2019 नुसार, पैसे भरूनही सेवा न मिळणे हा सेवेतील त्रुटी या अंतर्गत गंभीर गुन्हा ठरतो. गॅस एजन्सीने ग्राहकांच्या घरापर्यंत सिलिंडर पोहोचवणे हे नियमाने अनिवार्य आहे. मात्र, जव्हारमध्ये चित्र उलटे आहे. रखरखत्या उन्हात महिला, वृद्ध आणि लहान मुलांना तासनतास रांगेत उभे राहून सिलिंडर घरी वाहून न्यावा लागत आहे.
ग्राहकांकडून डिलिव्हरी चार्जेस वसूल केले जातात का? आणि जात असतील तर सेवा का दिली जात नाही? असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे. केवळ सेवेतील त्रुटीच नाही, तर सुरक्षेच्या बाबतीतही मोठा हलगर्जीपणा दिसून येत आहे.
भर वस्तीत विद्यावासीनी गॅसच्याच्या कार्यालयातच सार्वजनिक ठिकाणी सिलेंडरचा असुरक्षित साठा केला जात आहे तर काही सिलेंडर सनसेट पॉइंट,मेमण हॉल च्या बाजूला भरलेले सिलेंडर ग्राहकांना दिले जात आहे.
हे मानवी जीवनासाठी धोक्याचे आहे, गॅस एजन्सीच्या आवारात होणारी गर्दी आणि तिथे पाळले जाणारे नियम हे सुरक्षा मानकांचे उल्लंघन करणारे आहेत. एखादी दुर्घटना घडल्यास याला जबाबदार कोण? पुरवठा विभाग एखाद्या मोठ्या दुर्घटनेची वाट पाहत आहे का?
स्थानिक पुरवठा निरीक्षण अधिकारी (सप्लाय इन्स्पेक्टर ऑफिसर) आणि तहसील प्रशासनाचे या प्रकाराकडे असलेले दुर्लक्ष संशयास्पद आहे. प्रशासन गॅस एजन्सीवर दंडात्मक कारवाई का करत नाही? प्रशासनाच्या या मौनामुळे एजन्सीचे धाडस वाढत असून सर्वसामान्य जनतेला वेठीस धरले जात आहे.
विशेष म्हणजे या बाबत विद्यावासीनी गॅस एजन्सी च्या मालकांशी बोलल्यास तसेच त्यांना एखाद्या ग्राहकांने गॅस सिलिंडर घरपोच डिलिव्हरी द्या असे सांगीतल्यावर,त्या भांडायला उठतात, गॅस सिलिंडर संपले आहे,दोन दिवसांनी मिळेल अशी उत्तरे देतात ,त्या महिला असल्याने ग्राहक त्यांच्याशी बोलायला देखील घाबरतात, त्यामुळे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार ग्राहकांना सहन करावा लागत आहे.एकूणच गेल्या काही महिन्यांपासून सुरू झालेल्या गॅसच्या अडचणीमुळे नागरिकांचे पुरते हाल झाले आहेत.