

पालघर ः पावसाळी मासेमारी बंदीच्या कालावधीत अवैध मासेमारी करणार्यांवर मत्स्यव्यवसाय विभागाने कठोर कारवाई करण्याची मागणी समोर येत आहे. राज्यात जून पासून ऑगस्ट पर्यंत मासेमारी बंदीचा कालावधी जाहीर झाला आहे. बंदी कालावधीत अवैध मासेमारी करण्याची शक्यता आहे. त्यामुळे माशाच्या ऐन प्रजनन काळावर घाला घातला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर अशा बेकायदा मासेमारीला आळा घालणे गरजेचे बनले असून त्याच्या कारवाईची मागणी पुढे आली आहे.
उरण ते पालघर किनारी भागात अवैध मासेमारी चालते. त्यावर मत्स्यव्यवसाय विभाग कानाडोळा करत असल्याचे आरोप महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीने केला आहे. बेकायदेशीर मासेमारी करत असताना कोस्ट गार्ड, नेव्ही, सागरी पोलिस, महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड, कस्टम, स्थानिक पोलिस यांना अधिकार दिले असताना ते याकडे लक्ष का देत नाहीत असा स्वाल समितीने केला आहे. बेकायदा मासेमारीला लगाम घालण्यासाठी मुंबई शहर , उपगनगरला गस्ती नौका सुरु केल्या आहेत. पण अजून पालघर, ठाणे, येथे गस्ती नौका सुरु केल्या नाहीत, त्या कराव्यात अशी मागणी समितीने मत्स्यव्यवसाय आयुक्त यांच्याकडे निवेदनातून केली. झाई गावाच्या भागात गुजरातमधील बोटी मासेमारी करीत असल्याचे निदर्शनास आणले.
मत्स्यव्यावसाय आयुक्त किशोर तावडे यांनी अवैध मासेमारी सुरु असून विभाग कारवाई करत आहे. इतकेच नव्हे तर पुढे बेकायदा मासेमारी सुरु राहिली तर स्वत: लक्ष घालून कठोर कारवाई करेन असे आश्वासन तावडे यांनी समितीच्या शिष्टमंडळाला दिले. पालघर व ठाणे जिल्ह्यातील गस्ती नौका लवकरच सुरु करित आहोत,असे आश्वासन त्यांनी दिले. योजना आलेल्या असून त्या देखील लागू करण्यासाठी काम सुरु आहे. त्याबाबत कार्यशाळा देखील सुरु केल्या आहेत. असे तावडे यांनी समितीच्या पदाधिकार्यांना सांगितले. शिष्टमंडळात समितीचे कार्यध्यक्ष रामकृष्ण तांडेल, जयेश भोईर, भुवनेश्वर धनु, भूषण निजाई, प्रफुल तांडेल,आदी उपस्थित होते.