खानिवडे : विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा फायदा वसईत अनधिकृत बांधकामांचे पेव व माती माफिया सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. सद्ध्या विविध शासकीय कार्यालयातील अधिकारी कर्मचारी निवडणूक प्रक्रियेत व्यस्त आहेत. याचाच गैरफायदा घेऊन तालुक्यात भूमाफिया, मातीचोर व बेकायदा बांधकाम धारक मोठ्या प्रमाणात सक्रिय झालेले आहेत. याची प्रचिती वसईतील एका माती भराव प्रकरणी आली आहे.
अधिक माहितीनुसार, वसईतील गिरीज, भडाळे पाडा येथे मोठ्या प्रमाणात बेकायदेशीररित्या माती भराव करण्यात आला आहे या माती भरावाची 'रॉयल्टी' अर्थात 'स्वामीत्व धन' न भरता शासनाच्या महसुलाचे लाखो रुपयांचे नुकसान करून माती भराव केल्याचे सांगण्यात येत आहे. वसईच्या अश्या तक्रारी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हाधिकारी पालघर, उपविभागीय अधिकारी वसई व तहसीलदार कार्यालयात दाखल करण्यात आल्या असल्याची माहिती मिळत आहे.
मागील काही दिवसात निवडणूक प्रक्रियेचा गैरफायदा घेत तीवरांच्या झाडांची कत्तल करणे, बेकायदेशीर माती भराव करून त्यावर अनधिकृत बांधकामे उभी करण्याचा सपाटा सुरू झाला आहे. एका निवासी संकुलाला सोईस्कर रित्या माती भराव करुन सहकार्य केले जात असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. याबाबत तहसीलदार अविनाश कोष्टी यांना तक्रारीसह पुरावे सादर केले असता, याप्रकरणी त्यांनी कारवाईचे आश्वासन दिले आहे.