

पालघर : संघर्षाशिवाय मिळालेले सुख हे समाधानी नसते आणि चोर मार्गाने असे सुख समाधान शोधणाऱ्या व्यक्ती चुकीच्या मार्गाला जातात. सायबर क्राईम हा अशाच चोरमार्गाने झटपट पैसा कमावण्याची गुन्हेगारी बनली आहे. त्यामुळे स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर मोठे व्हा, चुकीच्या पद्धतीने मोठे होऊ नका असा सल्ला राज्याचे वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी दिला.
मुख्यमंत्र्यांच्या शंभर दिवसाच्या सात कलमी कार्यक्रमाच्या नावीन्यपूर्ण उपक्रमांतर्गत पालघर पोलिसांनी सायबर सुरक्षित पालघर हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी पालकमंत्री नाईक बोलत होते.
पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शाहीर आत्माराम पाटील नियोजन सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी सायबर जनजागृती विषयीच्या कॅलेंडरचे पुस्तिकेचे उद्घाटन मान्यवरांनी केले. पालघर पोलिसांनी सुरू केलेले सायबर सुरक्षित पालघर ही मोहीम समाजाला सतर्क करून फसवणुकीबाबत रोखेल असा विश्वास नाईक यांनी या कार्यक्रमात बोलताना व्यक्त केला.
अशा सायबर क्राईमशी संबंधित नवी मुंबईमध्ये सायबर कमांड सेंटर उभारण्यात आले असून त्यात आजवर १५० तज्ञ काम करीत आहेत, अशी माहिती त्यांनी सभागृहासमोर दिली. पालघर पोलीस दलातर्फे सायबर फसवणूक रोखण्यासाठी जिल्ह्यामध्ये सायबर विषयी जनजागृती आणण्यासाठी सायबर सुरक्षित पालघर हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे.
सायबर सुरक्षित पालघर उपक्रमांतर्गत राष्ट्रीय स्तराचे सायबर विषयक तज्ञ डॉक्टर दीपक शिकारपुरे यांनी आपल्या मार्गदर्शनात पालघरमध्ये सुरू केलेला हा उपक्रम राज्यात मॉडेल उपक्रम म्हणून सुरू करावे असे मत मांडले. कार्यक्रमात या उपक्रमांतर्गत जिल्हाभरात चित्रकला स्पर्धा घेण्यात आली होती. यामध्ये ५०० जणांनी सहभाग घेतला. त्यातून काही विजेत्यांना पालकमंत्री नाईक यांच्या हस्ते गौरविण्यात आले. तर सायबर जनजागृती अंतर्गत जिल्ह्यात साडेनऊशे सायबर योद्धा तयार झाले असून त्यापैकी पाच जणांना प्राथमिक स्वरूपात गौरवले गेले.
मोबाईल हरवलेल्या नागरिकांचे ५० मोबाईल पोलिसांनी परत मिळवले होते यापैकी काहींना या कार्यक्रमात त्यांच्या मोबाईल परत करण्यात आले. पालघर जिल्ह्यात दुसरा जनता दरबार २८ मार्च रोजी होणार होता. मात्र काही अपरिहार्य कारणास्तव हा जनता दरबार २ एप्रिल रोजी घेण्यात येणार होता. मात्र २ एप्रिल ऐवजी पालघर जिल्ह्यातील जनता दरबार हा ७ एप्रिल ला घेण्यात येणार आहे. अशी घोषणा पालकमंत्री गणेश नाईक यांनी या कार्यक्रमानिमित्त केली.
या कार्यक्रमात जिल्ह्याचे खासदार डॉक्टर हेमंत सवरा, विक्रमगडचे आमदार हरिश्चंद्र भोये, जिल्ह्याचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके, अप्पर जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगरे, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे, जिल्हा नियोजन अधिकारी प्रशांत भामरे, जिल्ह्यातील विविध उपविभागीय पोलीस अधिकारी व १६ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक, वाहतूक पोलीस नियंत्रण शाखा व पोलीस पाटील, जिल्हा दक्षता कमिटी, आदी उपस्थित होते.
• पालघर जिल्ह्यात जिल्हा पोलीस दल स्मार्ट झाले असून पोलिसांनी वेबसाईट, चॅटबोट, इंडस्ट्रियल तक्रार पोर्टल या माध्यमातून युजर फ्रेंडली बनण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे. आत्तापर्यंत चार्ट बोटच्या माध्यमातून २५० जणांनी या सेवेचा लाभ घेतला आहे. गतिशील प्रशासनात पालघर पोलीस दल आले असून अंतरिम प्रगती मूल्यांकनाच्या बाबतीतही पालघर जिल्हा राज्यात प्रथम आला आहे. यावेळी सायबर सुरक्षित उपक्रमांतर्गत जनजागृती पर वाहनाचे अनावरण पालकमंत्री नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.
पालघर जिल्ह्यात २०२३ च्या दरम्यान सायबर क्राईम अंतर्गत विविध नागरिकांची साडेसात कोटीची फसवणूक झालेली आहे. तर २०२४ मध्ये ही फसवणूक १८ कोटीच्या वर पोहोचली आहे. त्यामुळे सायबर क्राईम च्या गुन्ह्यांची स्थिती गंभीर आहे. हे लक्षात घेता या फसवणुकीचे प्रकार थांबवण्यासाठी सायबर सुरक्षित पालघर उपक्रम राबवण्यात आला असून या अंतर्गत विविध प्रणालीच्या माध्यमातून या गुन्ह्यांना आळा घालणे या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.