

पालघर ः बहिरीफोंडा-जायशेत ग्रामपंचायत हद्दीतील ठाकूरपाडा भागातून खैराच्या ओंडक्यांची वाहतूक करणारी कार जप्त करण्यात वनविभागाच्या कर्मचार्यांना यश आले आहे.रविवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास वांद्री धरणाच्या उजव्या कालव्यावरून मुंबई अहमदाबाद महामार्गाकडे जाणार्या रस्त्यावर बांबरोठे गावाच्या हद्दीत सापळा रचून इको कार जप्त करण्यात आली. गेल्या दोन आठवड्यांच्या कालावधीत बहिरी फोंडा जायशेत परिसरात तिसरा खैर तस्करीचा दुसरा प्रकार उघडकीस आला आहे.याप्रकरणी कार चालका विरोधात वनगुन्हा नोंदवण्यात आला असून तस्करीत सहभाग असलेल्या आरोपींचा शोध सुरू करण्यात आला आहे.
बहिरी फोंडा जायशेत भागातून खैर तस्करी होणार असल्याची गोपनीय माहिती दहिसर तर्फे मनोर वनपरीक्षेत्राच्या कर्मचार्यांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार कारवाईसाठी दहिसर आणि भाताने वनपरीक्षेत्राच्या कर्मचार्यांनी रविवारी सायंकाळ पासून गांजे आणि बांबरोठे भागात पाळत ठेवली होती.
रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास एक संशयित इको कार बहिरी फोंडा जायशेत रस्त्यावरून वांद्री धरणाच्या उजव्या कालव्या वरून बांबरोठे गावाच्या दिशेने जाऊ लागली असता वनविभागाच्या कर्मचार्यांनी पाठलाग सुरु केला तसेच बांबरोठे येथिल कर्मचार्यांना इको कार बद्दल माहिती दिली. संशयित इको कारला बांबरोठे गावाच्या हद्दीत रोखण्यात वनविभागाच्या कर्मचार्यांना यश आले. इको कार चालक अंधाराचा फायदा घेऊन जंगलात पळून गेला. वनविभागाच्या कर्मचार्यांनी कारची तपासणी केली असता कार मध्ये खैराचे सोलीव ओंडके आढळून आले.
खैराचे ओंडके वाहतूक करणारी इको कार ताब्यात घेण्यात आली असुन कार चालका विरोधात दहिसर तर्फे मनोर वनपरीक्षेत्र कार्यालयात वन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या दोन आठवड्यात बहिरी फोंडा जायशेत भागातून खैर तस्करीचा तिसरा प्रयत्न उघडकीस आला आहे.पर्यावरण संवर्धनासाठी बांबू लागवडीसारख्या योजना जाहीर केल्या जात असताना पालघर जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांचा वनविभाग मौल्यवान खैराच्या झाडांची कत्तल रोखण्यात अपयशी ठरत आहे.
तस्करीच्या उद्देशाने लाकूड माफिया जंगलातील खैराच्या झाडांची कत्तल करून ओंडके तयार करून ओंडके जंगलातील झुडुपांमध्ये लपवून ठेवतात, ओंडक्यांची वाहतूक करण्यासाठी वनविभागाचे कर्मचारी आणि गस्ती पथकावर पाळत ठेवली जाते.रात्रीच्या वेळी इको सारख्या प्रवाशी वाहतूक करणार्या कार सारख्या वाहनां मधून छुप्या पद्धतीने ओंडके बाहेर काढले जातात,
बहिरीफोंडा जायशेत परिसरातील जंगलात खैर आणि सागवान सारख्या मौल्यवान वृक्षसंपत्तीमुळे जंगलात तस्करांची वर्दळ वाढली आहे.वांद्री धरणाच्या बुडीत क्षेत्रालगत असलेल्या जंगलातून खैराच्या झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल आणि तस्करी केली जात आहे. वनविकास महामंडळ, दहिसर तर्फे मनोर आणि भाताणे वनपरीक्षेत्रांच्या सीमा एकमेकांना लागून असल्याने कारवाई दरम्यान वनविभागाच्या कर्मचार्यांमध्ये समन्वयाचा अभाव दिसून येतो. खैर तस्करी रोखण्यासाठी वांद्री धरणाच्या प्रवेशद्वारासमोर तपासणी नाका उभारण्यात आला आहे.चौकीवर कायमस्वरूपी कर्मचारी नसल्यामुळे तस्करांना संधी मिळत आहे.