

Jawhar Rajewadi health crisis
मोखाडा: जव्हार तालुक्यातील नांदगाव ग्रामपंचायत मध्ये येणाऱ्या राजेवाडी या पाड्यात गॅस्ट्रोची साथ आली आहे. गॅस्ट्रोमुळे चिंतू गोंड (वय ५५) आणि अनिता गांगड (वय ४५) या दोन व्यक्तींचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात भीतीची वातावरण पसरले आहे. सध्या १४ रुग्ण उपचार घेत असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
पावसाळा सुरू झाला की विहिरींवर अवलंबून असलेल्या अनेक गावांत दूषित पाण्यामुळे साथीचे रोग पसरत असतात. ही साथ आटोक्यात आणण्यासाठी जव्हार आरोग्य विभाग प्रयत्नशील आहे. दोन दिवसांपूर्वी लोकांना जुलाब, उलटीचा त्रास व्हायला लागला. मात्र, याची तीव्रता वाढत जाऊन अनेक नागरिकांना उपचारासाठी जव्हार कुटीर रुग्णालय, नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. यातील एकाचा जव्हार रुग्णालयात तर एकाचा राहत्या घरी मृत्यू झाला.
नांदगाव येथे जलजीवन योजनेचे काम हाती घेण्यात आले आहे, मात्र ते अद्याप पूर्ण न झाल्याने येथील लोकांना विहिरीच्या पाण्यावर अवलंबून रहावे लागत आहे. मात्र, पडणारा पाऊस, अस्वच्छता, उताराच्या मार्गाने वाहत जाणारे नाल्याचे पाणी यामुळे विहिरीतील पाणी दूषित होते. त्यातूनच हा प्रकार झाल्याचे बोलले जात आहे. एकूणच जव्हार मोखाडा सारख्या दुर्गम भागातील गाव, पाडे आजही विहिरीच्या पाण्यावर अवलंबून आहेत. पावसाळ्यात साथीच्या रोगांची शक्यता वाढते. याचा गरोदर माता, बालकांना त्रास होतो.
दोन वर्षांपासून जलजीवन योजनेचे काम चालू आहे. ते पूर्ण झालेले नाही. विहिरींची साफसफाई केली नसल्यामुळे दूषित पाण्यामुळे गावातील दोन लोकांना जीव गमवावा लागला आहे.
- संजय भले, ग्रामस्थ, राजेवाडी
आम्ही दोन दिवसांपासून गावात सर्व्हे करीत आहोत. जिल्हा आरोग्य अधिकारी यांनीही येथे भेट देऊन पाहणी केली आहे. दोन गॅस्ट्रो संशयित रुग्ण दगावले आहेत. बाकी रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. तालुका आरोग्य विभाग आणि ग्रामीण रुग्णालयाकडून आवश्यक त्या उपाययोजना सुरू आहेत.
- डॉ. किरण पाटील, तालुका आरोग्य अधिकारी, जव्हार