

वाडा : मच्छिंद्र आगिवले
रस्ता कमी खड्डे जास्त अशी अवस्था, एखादी चारचाकी बसावी इतका मोठा खड्ड्यांचा आकार, चिखलाचे साम्राज्य, चांगल्या मार्गावरील पुलांवर अपूर्ण कामे, अवजड वाहनांसह चारचाकींच्या रांगा, जागोजागी केलेले खोदकाम अशी बिकट अवस्था वाडा भिवंडी या महामार्गाची बनली आहे. शेकडो आंदोलने, रोज दिले जाणारे इशारे, हजारों निवेदने व आजपर्यंत गेलेले असंख्य बळी या सर्वांचे बलिदान अजूनही कमीच असल्याने रस्त्याच्या अवस्थेत कोणतीही सुधारणा होताना दिसत नाही हे आश्चर्य म्हणावे लागेल.
सरकारचा महामार्ग निर्माणाचा उद्देश सुकर व जलद प्रवासाची हमी देण्यासाठी असतो मात्र राज्यातील सर्वात खराब महामार्ग म्हणून भिवंडी वाडा - मनोर या महामार्गाची असणारी ओळख मागील १३ वर्षांपासून कायम आहे. रस्त्यासह खड्ड्यांचीही अवस्था भीषण बनली असून त्यात पडलेला चिखल सर्वांनाच डोकेदुखीचा विषय बनला आहे. ८०० कोटींचा खर्च करून काँक्रीटीकरणाचे काम हाती घेतले आहे मात्र त्याबाबत लोकांची तीव्र नाराजी आहे. गणेशोत्सव सुरू असून बाप्पाचे आगमन याच खड्ड्यांमधून झाल्याने हे विघ्न टळणार तरी कधी असा सवाल विचारला जात आहे. राजकीय पक्ष, विविध संघटना, पीडित रहिवाशी व सर्वपक्षीय नेते या सर्वांनी आजपर्यंत कित्येक आंदोलने केली मात्र यामुळे कुठेही रस्त्याची अवस्था टीचभरही सुधारलेली पहायला मिळत नाही हे दुर्दैव आहे.
सत्ताधारी आमदार व खासदारांनी पाहणी करून निवेदने देत प्रसंगी हाती घमेली व फावडे घेतली मात्र त्यांच्या शब्दांनाही राजकारणात थारा नाही असे रस्त्याची अवस्था पाहता लोकांचे म्हणणे आहे. रस्त्यावरून प्रवास करणारे नोकरदार व विद्यार्थी तसेच बसचालक यांचा मात्र सत्कार करावा अशी मागणी करण्यात येत आहे. खराब रस्त्याची तक्रार कुणाकडे करायची असा लोकांना प्रश्न पडला असून राजकीय अनास्था याला जबाबदार असल्याचे बोलले जात
आहे. एकदोन नव्हे तर तब्बल १५ वर्षांपासून रस्त्याच्या दुर्दशेमुळे होणारा छळ मुकाट्याने सहन करणाऱ्या जनतेच्या सहनशीलतेची मात्र दाद द्यावी लागेल. वेळोवेळी झालेल्या आंदोलनात गुन्हे दाखल झाल्याने हल्ली कुणी आंदोलन करायला तयार नाही अशी अवस्था असून राजकीय स्वार्थासाठी उभारलेल्या आंदोलनांवर आता कुणाचाही विश्वास राहिला नसल्याचे लोकं बोलतात. लोकांच्या आरोग्यासोबत वाहनांची अवस्थाही दयनीय झाल्या असून महामार्ग म्हणजे एक शाप आहे असेही लोकं संतापाने सांगतात.
रस्त्यामुळे नात्यांमध्ये दुरावा?
नेहरोली, कुडूस, अंबाडी या भागातील गावांमध्ये खराब रस्त्यामुळे महत्वाचे काम वगळता कुणीही येजा करायला तयार नसून नात्यात दुरावा वाढत चालल्याचे लोकांचे म्हणणे आहे. गणेशोत्सव या मोठ्या सणावरही संक्रांत कोसळली असून खराब रस्त्यामुळे कुणीही बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी या महामार्गावरून जायला तयार नाही अशी अवस्था आहे. गणेशोत्सवापूर्वी महामार्गाची अवस्था सुधारा असा देण्यात आलेले इशारे हवेत विरळ्याचे पाहायला मिळत आहे.