खानिवडे : पुढारी वृत्तसेवा : महाभारतात खेळला गेलेला सारीपाट (द्यूत ) हा खेळ ज्या खेळाचे दर्शन जय मल्हार मालिकेतून अवघ्या महाराष्ट्राला झाले. तो सारीपाट खेळ गणेशोत्वाच्या दिवसात वसईतील शिरवली या गावात खेळाला जात आहे. मागील ८७ वर्षांपासून दर गणेशोत्सवात हा खेळ खेळाला जात असून आजदेखील ही परंपरा सुरू आहे. महत्वाचे म्हणजे हा खेळ पालघर जिल्ह्यात एकमेव फक्त्त शिरवली या गावात खेळला जातो. त्यामुळे या गावचे कुतूहल सगळीकडे निर्माण झाले आहे.
या खेळासाठी कापडी सारीपाट वापरला जात असून सोंगट्या म्हणून लाकडी सोंगट्यांचा वापर केला जातो. लाकडी सोंगट्या कापडी पटावर ठेऊन हा खेळ सुरु होतो. तसेच फासे म्हणून कवड्याचा वापर केला जातो. ज्याप्रमाणे खेळाडू कवड्याचे दान घेतो, त्या दानानुसार सोंगटी पटावर चालवली जाते. हा खेळ दोन गटात खेळवला जात असल्यामुळे ज्या गटाच्या सोंगट्या सारीपाटाच्या मध्यभागी जातील तो गट विजयी होतो. तर एका गटाने सोंगटी मारल्यानंतर दुसऱ्या विरोधी गटाने त्या गटाची सोंगटी मारली तर हा खेळ बरोबरीत सूटतो.
या खेळात एक डाव पूर्ण होण्यासाठी ४ तास लागतात. विशेष म्हणजे या खेळात पैश्याचा वापर केला जात नाही. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात व एक उत्सव म्हणून मागील अनेक वर्षापासून गणपतीत जागर व्हावा म्हणून करमणुकीसाठी हा खेळ खेळला जातो. पूर्वी या खेळात मोठ्या प्रमाणात तरुण वर्गाचा सहभाग असायचा. मात्र सध्या मैदानी खेळांप्रमाणेच तरुण वर्गाने या पारंपरिक खेळाकडे पाठ फिरवल्याने जुने-जाणते व काही उत्सुक तरुणच हा खेळ खेळत असून परंपरा जपत आहेत, असे खेळाडू विनोद मोकाशी यांनी सांगितले.