कामे न करता तयार केले कामे पूर्ण झाल्याचे दाखले

एक कोटी रुपयांचा निधी सार्वजनिक बांधकाम खात्यात वर्ग
Palghar ZP
पालघर जिल्हा परिषदfile photo
Published on
Updated on

पालघर : पालघर पूर्वे कडील प्राथमिक जिल्हा मार्ग असलेल्या चहाडे खडकोली रस्त्यावरील दहा मोऱ्यांच्या दुरुस्तीची कामे न करता, मोऱ्यांची कामे पूर्ण झाल्याचे दाखले तयार करून जिल्हा नियोजन समिती कडून एक कोटी रुपयांचा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाने खात्यात वर्ग करून घेतला आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यरत अभियंत्यांनी सुमारे एक कोटी रुपयांचा अपहार करण्याच्या उद्देशाने कामे न करता पूर्णत्वाचे दाखले तयार करून शासनाची दिशाभूल केल्या प्रकरणी शाखा आणि उपविभागीय अभियंत्यां विरोधात कारवाईची मागणी केली जात आहे. दरम्यान, कामे न करता निधी वर्ग केल्याची माहिती बाहेर गेल्याची कुणकुण ठेकेदारांना लागताच बुधवारी सकाळी मोऱ्या तयार करण्यासाठी जेसीबी मशीनच्या साहाय्याने खोदकाम सुरु करण्यात आले होते. परंतु कार्यकारी अभियंत्यांच्या निर्देशा नंतर खोदकाम बंद करण्यात आले आहे.

पालघर पूर्वेकडील प्राथमिक जिल्हा मार्ग असलेल्या चहाडे खडकोली रस्त्यावर दहा साकव मोऱ्यांच्या दुरुस्तीची कामे प्रास्तावित करण्यात आले होते. जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत समाविष्ट साकव कामांची माहिती (५०५४४५१६२) हेड अंतर्गत आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये दहा मोऱ्यांची दुरुस्तीची कामे मंजूर करण्यात आली होती. प्रत्येक मोरीच्या दुरुस्तीसाठी दहा लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता.

निविदा प्रक्रिया राबविण्यात आल्यानंतर आशीर्वाद मजूर कामगार सोसायटीला दोन, विजय मजूर कामगार सोसायटीला दोन, स्नेहा मजूर कामगार तीन सोसायटी आणि कीर्ती कामगार सोसायटी सोबत तीन मोऱ्यांची बांधकामे करण्याचे करार करण्यात आले होते. चहाडे खडकोली रस्त्यावरील सर्व मोऱ्यांची कामे जानेवारी महिन्यात सुरु करून मार्च महिन्यात पूर्ण झाल्याचे उपविभागीय अभियंता आणि कार्यकारी अभियंता यांच्या सहीचे दाखले जोडून ०५ मार्च २०२५ रोजी सन २०२३ २४ आर्थिक वर्षात पूर्ण असलेल्या कामांची देयके अदा करण्यासाठी एक कोटी रुपये निधीच्या मागणीचे पत्र जिल्हा नियोजन समिती कार्यालयाला सादर करण्यात आले होते.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांच्या मागणी पत्राच्या अनुषंगाने जिल्हा नियोजन समिती मार्फत तात्काळ एक कोटी रुपयांचा निधी बांधकाम विभागाकडे वर्ग कारण्यात आला आहे. निधीचा अपहार करण्याच्या उद्देशाने मोऱ्यांची बांधकामे न करता पूर्णत्वाचे खोटे दाखले तयार करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंता आणि उपविभागीय अभियंत्यां विरोधात कारवाईची मागणी जोर धरत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news