

विक्रमगड : राज्यात कृषी विभागातर्फे तालुका, जिल्हा विभाग, राज्य पातळीवर पीक स्पर्धा राबवण्यात येते. रब्बी हंगाम २०२४-२५ मध्ये धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठीही तालुका, जिल्हा व राज्य पातळीवर सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवस या ५ पिकांसाठी पिक स्पर्धेचे आयोजन केले आहे.
मात्र वरील पिकांपैकी विक्रमगड तालुक्यात हरभरा पिकाची लागवड केली जात असुन हरभरा लागवड केलेल्या जास्तीत-जास्त शेतकऱ्यांनी या रब्बी हंगामातील पिक स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी यांनी केले आहे.
पीक स्पर्धेमुळे आणखी उमेदीने शेतकऱ्यांमधून नवनवीन अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर होईल, त्यामुळे कृषी उत्पादनात भर पडेल. प्रगतशील शेतकऱ्यांचे योगदानातून परिसरातील इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन होवून राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल या उद्देशाने राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीत धान्य पिकांच्या पीकस्पर्धा राबवण्यात येत आहेत. या पीक स्पर्धेत ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवस या ५ रब्बी पिकांचा समावेश आहे.
या स्पर्धेतील सहभागासाठी शेतकऱ्याकडे स्वतःची जमीन असावी व तो स्वतः जमीन कसणारा असावा, अशी अट आहे. तालुका ते राज्य पातळीवरील बक्षीसेः सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय असे तालुका पातळीवर ५ हजार, ३ हजार व २ हजार रुपये, जिल्हा पातळीवर १० हजार, ७ हजार व ५ हजार रुपये तर राज्यपातळीवर ५० हजार, ४० हजार व ३० हजार रुपये अशी बक्षिसे असणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतात नवनवीन प्रयोग करून उत्पादनवाढीसाठी प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांना तालुका, जिल्हा, राज्यस्तरावर पोहोचवण्यासाठी ही स्पर्धा उपयुक्त ठरेल.
रब्बी हंगामात विक्रमगड तालुक्यात हरभरा हे पिक घेतले जात असून या पिकाची पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना या स्पर्धेत सहभागी होऊन बक्षीस मिळविण्याची संधी असून ३१ डिसेंबर पर्यंत शेतकऱ्यांना सहभाग घेण्याची संधी आहे.