

पालघर : पालघर जिल्ह्यात विविध माध्यमातून भाजप आपले प्रस्थ वाढवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करत आहे. त्यातच पालघर-ठाण्यात भाजपचे मंत्री गणेश नाईक यांनी घेतलेल्या जनता दरबारानंतर शिवसेना- भाजप वाद उफाळला होता. त्यामुळे जिल्ह्यात भाजप असे अनेक उपक्रम राबवून पालघर जिल्ह्यातील शिवसेनेचे प्राबल्य कमी करते की काय अशी चर्चा सध्या पालघरच्या राजकीय गोटात आहे.
भाजपचे प्रस्थ वाढवण्याच्या दृष्टीने पालघरमधील राजकीय परिस्थितीची पुरेपूर जाण असलेले भाजपचे मंत्री गणेश नाईक यांना पालघर जिल्ह्याची धुरा देण्यात आली. पालकमंत्री झाल्यानंतर तातडीने त्यांनी जनता दरबार घेतला. त्यानंतर अनेक राजकीय तर्क वितर्क व चर्चा सुरू झाल्या. अलीकडच्या आमदारकीच्या निवडणुकीत भाजप पालघर जिल्ह्यातील बहुतांश जागा लढवण्यासाठी अति आग्रही होते.
वरिष्ठ पातळीवरील जागा वाटपात चर्चा झाल्यानंतर अखेरच्या क्षणी बोईसर व पालघर विधानसभा शिवसेनेच्या वाट्याला आली. डहाणू, नालासोपारा. वसई, विक्रमगड अशा चार विधानसभांवर भाजपने सर्वाधिक उमेदवार उभे केले. भाजपने शर्तीचे प्रयत्न करून विक्रमगड, नालासोपारा, वसई या तीन विधानसभांवर आपला झेंडा फडकवला. तर बोईसर व पालघर विधानसभा शिवसेनेने मिळवल्या. या आधीच भाजपचा खासदार पालघर जिल्ह्यात निवडून आले होते.
एकंदरीत शिवसेनेचे व बहुजन विकास आघाडीचे प्राबल्य असलेल्या जिल्ह्यात भाजपने बहुजन विकास आघाडीला नामोहरम केले व जिल्ह्यात सर्वाधिक आमदार निवडून आणले. यानंतर भाजपने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आपला विस्तार सुरू केला. या विस्तारानंतर शिवसेनेच्या प्राबल्याला धोका पोहोचत असल्याच्या चर्चा जिल्ह्यात निर्माण होऊ लागल्या.
अलीकडच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालघरच्या पालकमंत्रीपदी पालघरच्या राजकीय शक्तींची माहिती असलेले जाणकार असे गणेश नाईक यांची वर्णी लावली. गणेश नाईक यांनी पक्ष वाढीच्या दृष्टिकोनातून जनता दरबारासह भाजप प्रवेश, कार्यकर्त्यांच्या भेटी अशा कार्यक्रमाचा सपाटा सुरू केला. त्यातच नालासोपारा, वसई, विक्रमगड या तीन विधानसभामधील भाजप आमदार यांनी झपाट्याने काम सुरू करून पक्ष वाढीसाठी प्रयत्न सुरु केले आहेत. जिल्ह्याचे भाजपचे खासदार जिल्हाभर फिरून भाजपची छाप पाडण्याचे काम करत आहेत.
जिल्ह्यातील भाजपच्या या सर्व प्रमुख लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नांमुळे पालघरमध्ये भाजपचा झपाट्याने विस्तार होत आहे. हे लक्षात घेता शिवसेना पक्षातही इन्कमिंगचे सत्र सुरू झाले आहे. दोन्हीही पक्ष पक्ष वाढीसाठी तेवढ्याच ताकदीने प्रयत्न करत असल्याने शिवसेना व भाजप करत असल्याने शिवसेना व भाजप एकत्र असले तरी या प्रकारातून एक वेगळी चर्चा राजकीय क्षेत्रात ऐकायला मिळत आहे. सद्यस्थितीला महानगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती, जिल्हा परिषद, पंचायत समिती अशा निवडणुका तोंडावर आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने आतापासूनच जोरदार तयारी सुरू केली आहे.
शिवसेनेचे प्राबल्य केली आहे. शिवसेनेचे प्राबल्य असलेल्या भागांमध्ये भाजप अधिक जोर देताना दिसून येत आहे. आतापासूनच नागरिकांना आश्वासने, स्वखर्चातून कामे, तरुणांना सोबत घेऊन फिरणे, त्या क्षेत्रांमध्ये भरघोस निधी देऊन विकास कामे, हळदीकुंकू कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा आयोजन असे अनेक विविध कार्यक्रम जोरात राबवले राबवले जात आहेत. आहेत. यासह विक्रमगड, वसई, नालासोपारा या विधानसभांमध्ये आमदार व पदाधिकारी अगदी बारशापासून ते वाढदिवसाच्या सर्व कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत. तर शिवसेना स्वमार्गाने त्या दृष्टीने प्रयत्न करत आहे. एकंदरीत हे प्रयत्न महायुतीलाही मारक ठरणारे आहेत.