

दिवा : दिवा शहरात वाढत्या गुन्हेगारीचा निषेध नोंदवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना दिवा शहर तर्फे सोमवार 15 डिसेंबर रोजी दिवा पोलीस चौकी येथे निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे. सदर मोर्चा हा छत्रपती शिवाजी महाराज चौक दिवा येथून सुरू होऊन दिवा पोलीस चौकी, दातिवली रोड येथे संपेल अशी माहिती दिवा मनसेकडून देण्यात आली आहे.
दिवा शहरात गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारीचे प्रमाण अत्यंत वेगाने वाढत असून शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती पूर्णपणे ढासळलेली दिसून येत आहे. विविध अवैध धंदे, अमली पदार्थांचा उघडपणे होत असलेला वापर आणि रस्त्यावर वाढलेले गुन्हेगारी प्रवृत्तीचे प्रकार यामध्ये लक्षणीय वाढ झालेली दिसून येत आहे. या सर्व गोष्टींना स्थानिक पोलीस प्रशासनाचा गुन्हेगारांवर नसलेला धाक हा कारणीभूत असल्याचे मत दिवा मनसेचे शहर अध्यक्ष तुषार पाटील यांनी व्यक्त केले आहे.
दिवा शहरातील अनेक वस्त्यांमध्ये गर्दुल्ले आणि नशेडी प्रवृत्तीचे लोक खुलेआम चरस गांजा आणि एमडीसारख्या अमली पदार्थांचे सेवन करताना दिसून येतात. शाळा महाविद्यालय आणि क्लासेस यांच्या परिसरातही अशा प्रकारच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येत आहे. अल्पवयीन मुलांची गुन्हेगारी चिंताजनक पातळीवर पोहोचलेली आहे. आठ दिवसांपूर्वी घडलेल्या तरुणाच्या हत्येत अल्पवयीनांचा सहभाग असल्याचे देखील उघडकीस आले होते. छत्रपती शिवाजी महाराज चौकात रस्त्यावर उघड्यावरती दारू पिणे, खोट्या कागदपत्रांच्या आधारे आधार कार्ड बनवून दिव्यामध्ये वास्तव्य दाखवणे, कळवा, मुंब्रा, मुंबईतील गुन्हेगारी प्रवृत्तीचे व्यक्ती दिव्यात रिक्षा चालक म्हणून काम करणे असे प्रकार दिव्यात सर्रास घडून येतात. अशा प्रकारांमुळे नागरिकांच्या सुरक्षा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे असे तुषार पाटील यांनी म्हटले आहे.