

पालघर : पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कुपोषण आणि विविध कारणामुळे चार हजारांपेक्षा जास्त बालमृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या अकरा वर्षात हे बालमृत्यू झाले आहेत. तत्कालीन ठाणे जिल्हा असताना जव्हारमधील वावर वांगणीमध्ये कुपोषण व बालमृत्यूच्या आकडेवारीचा स्फोट झाला होता. संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून या प्रकारायावत संताप व हळहळ व्यक्त झाली. त्यानंतर आरोग्य विभाग खडबडून जागे झाले व कोट्यवधीचा निधी ग्रामीण भागासाठी कुपोषण निर्मूलनाच्या नावाखाली येत गेला. मात्र आजपर्यंत बालमृत्यूचा शाप जिल्ह्याला कायम आहे. आतापर्यंत एकूण ४०९४ बालमृत्यू जिल्ह्यातील आठ तालुक्यात झाले आहेत.
पालघर जिल्ह्याच्या जव्हार, मोखाडा, डहाणू तलासरी व वाडा अशा ग्रामीण भागांमध्ये कुपोषणाबरोबरीने बालमृत्यूचे प्रमाण लक्षणीय आहे. ग्रामीण भागांमध्ये बालविवाह सारख्या अनिष्ट रूढी परंपरा अजूनही कमी झालेल्या नाहीत. पालघर जिल्ह्यात गेल्या पाच वर्षात पाचशेहून अधिक बालविवाह झाल्याचे अलीकडे एका सर्वेक्षण अहवालातून समोर आले होते. न्यायालयानेही या संदर्भात राज्य शासनाला फटकारले होते.
बाल विवाहामुळे कुपोषण, बालमृत्यू व मातामृत्यू सारखे गंभीर परिणाम समोर येत आहेत. पालघर जिल्ह्यात सर्वाधिक बालमृत्यू हे मुदतपूर्व प्रसूती (कमी दिवसात जन्मलेली बालके/प्रिमॅच्यूर) झाल्यामुळे दगावल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. मुदतपूर्व प्रसूती होण्याचे प्रमाण जास्त असल्याने ते थांबवण्याचे मोठे आव्हान आरोग्य विभागासमोर आहे.
पालघर जिल्ह्यातील बालमृत्यू, मातामृत्यू वास्तववादी असले तरी गेल्या काही वर्षात जिल्हा परिषद- तील लोकप्रतिनिधींनी केलेले प्रयत्न, आरोग्य विभागासह इतर विभागांच्या समन्वयामुळे व जनजागृतीमुळे बालमृत्यू कमी होत आहेत. राज्याच्या व राष्ट्रीय पातळी- वरील मृत्यूदरापेक्षा पालघर जिल्ह्यातील मृत्युदर अत्यल्प आहे असे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत संगिण्यात आले आहे.
कुपोषण, कमी दिवसात जन्मलेले बाळ, कमी वजनाचे बाळ, इतर आजार, अपघात, श्वासोश्वास कोंडणे अशा विविध कारणांनी ० ते ६ वर्षाच्या बालकांचा बालमृत्यू होत असल्याचे तज्ज्ञमार्फत सांगण्यात येते. तर रक्तक्षय, मुदत पूर्व प्रसूती, शारीरिक कमजोरी, हृदयविकार अशा कारणांमुळे माता मृत्यू होत आहेत. पालघर जिल्ह्यात मुदतपूर्व प्रसूतीमुळे बालकांची मृत्यू झाल्याची संख्या जास्त असली तरी कमी वजनाचे बाळ जन्मल्या मुळेही मृत्यूचे प्रमाण आहे. पालघर जिल्ह्यात आतापर्यंत कमी दिवसात जन्मलेली बालके दगावल्याची संख्या लक्षणीय आहे. तर मुदतपूर्व प्रसूती, जन्मतः श्वासोच्छवास कोंडून, तीव्र फुफ्फुस विकार, अपघात, जन्मतः व्यंग, जंतू संसर्ग, प्राणी व सर्पदंश, हृदयविकार, ताप, डायरिया, अतिसार, हायपोथेरीमीया, पचनसंस्था दोष, दमा, मेंदूज्वर अशा आजारांमुळे बालकांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे.