

डहाणू : डहाणू शहरातील मसोली परिसरात सेंट मेरीज हायस्कूल जवळ असलेली चर्चची जीर्ण दगडी भिंत अखेर हटवण्यात आली असून, संभाव्य अपघाताचा धोका टळला आहे. डहाणू नगरपरिषद प्रशासनाने तात्काळ कारवाई करत ही भिंत निष्कासित केल्याने परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. ही भिंत अनेक दिवसांपासून धोकादायक स्थितीत होती. विशेषतः शाळकरी विद्यार्थी, पालक व स्थानिक नागरिक यांची या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात ये-जा होत असल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला होता.
ही भिंत चर्चच्या मालकीची असून ती रस्त्याच्या कडेला होती. दीर्घकाळापासून देखभाल दुरुस्ती न झाल्यामुळे भिंतीची अवस्था अतिशय जीर्ण झाली होती. विशेषतः पावसाळ्यात तिच्यावरचा दबाव वाढल्याने ती केव्हाही कोसळण्याची शक्यता होती. त्यामुळे स्थानिक नागरिक, पालक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी याबाबत प्रशासनाकडे तक्रारी केल्या होत्या.
नागरिकांच्या सुरक्षेचा विचार करता ही बाब दैनिक पुढारीने 11 जुलैच्या अंकात डहाणूत धोकादायक दगडी भिंतीला लाकडी टेकूचा आधार या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध केली होती. या बातमीची गांभीर्याने दखल घेत डहाणू नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अक्षय गुडधे यांनी बांधकाम विभागाला तात्काळ कारवाईचे निर्देश दिले. त्यानंतर नगरपरिषद व चर्च ट्रस्ट यांच्यात संयुक्त बैठक पार पडली.
चर्च ट्रस्टने सकारात्मक भूमिका घेत नागरिकांच्या सुरक्षेसाठी भिंत हटवण्यास तात्काळ सहमती दर्शवली. याच बैठकीत चर्च ट्रस्टने त्यांच्या मालकीतील रस्त्यालगतची जागा रस्ता रुंदीकरणासाठी नगरपरिषदेला उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही दिले. त्यामुळे आता या परिसरात रस्ता रुंदीकरणाचा मार्ग मोकळा झाला असून वाहतुकीची सुलभता व अपघात टाळण्यासाठी याचा मोठा फायदा होणार आहे.
18 जुलै रोजी या भिंतीचे अधिकृतरीत्या निष्कासन सुरू करण्यात आले असून हे काम ठेकेदार भाविन शहा यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. डहाणू नगरपरिषदेचे बांधकाम अभियंता महेश डफळ यांनी याबाबत माहिती दिली. या संपूर्ण प्रक्रियेमुळे संभाव्य धोका टळल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. मुख्याधिकारी अक्षय गुडधे यांच्या तत्पर निर्णयाचे आणि दैनिक पुढारीचे नागरिकांकडून कौतुक होत आहे. स्थानिक ग्रामस्थ, पालक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी नगरपरिषदेच्या सहकार्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे.
सेंट मेरीज हायस्कूल जवळील चर्चची संरक्षक भिंत जीर्ण झाल्याने धोकादायक झाली होती. ती भिंत रस्ता रुंदीकरणामध्ये बाधित होणार होती, त्यामुळे चर्च प्रशासनाशी चर्चा करून ती निष्कासित करण्यात आली आहे.
अक्षय गुडधे, मुख्याधिकारी, नगरपरिषद डहाणू
वेळीच उपाययोजना झाली नसती, तर मोठा अपघात घडला असता. आमच्या मागणीची दखल घेऊन तात्काळ कृती केल्याबद्दल डहाणू नगरपरिषदेचे आणि दैनिक पुढारीचे आभार मानतो.
राजेश दळवी, स्थानिक ग्रामस्थ