

पालघर ः उत्पादन शुल्क विभागाला शनिवारी पहाटे जव्हार जामसर रस्त्यावर दमण बनावटीच्या दारूची तस्करी रोखण्यात यश आले आहे.सापळा रचून केलेल्या कारवाईत जप्त टेम्पो मधून दमण बनावटीच्या दारूचे 115 बॉक्स दारू साठा जप्त करण्यात आला आहे. कारवाई दरम्यान सोळा लाख 75 हजार 360 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून टेम्पो चालकाला अटक करत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दमण बनवटीच्या दारू तस्करी विरोधात कारवाईसाठी उत्पादन शुल्क विभागाच्या डहाणू कार्यालयाचे निरीक्षक सुनिल देशमुख तसेच भरारी पथकाचे निरीक्षक अरुण चव्हाण यांच्या यांच्या नेतृत्वातील पथकाने शनिवारी पहाटे जव्हार जामसर रस्त्यावर सापळा रचला होता.
पहाटेच्या सुमारास जव्हार-जामसर रस्त्यावर हिराडपाड्याच्या हद्दीत एका संशयित टेम्पोला भरधाव वेगाने जव्हारच्या दिशेने जात होता. टेम्पोचा पाठलाग टेम्पोची तपासणी केली.तपासणी दरम्यान टेम्पो मध्ये दमण बनवटीच्या दारूचे 115 बॉक्स आढळून आल्याने मद्यसाठ्यासह टेम्पो ताब्यात घेण्यात आला. टेम्पो चालक प्रताप उदय सिंह (26) याला अटक करण्यात आली आहे.