

कासा ः डहाणू तालुक्याच्या पूर्व भागातील कासा, चारोटी, घोळ, धामटणे, पेठ, कोल्हाण, धरमपूर, सायवान, वाघाडी आदी शेकडो गावांतील नागरिक गेल्या चार-पाच दिवसांपासून अंधारात जगत आहेत. पावसाळा सुरू होताच वीज गायब होणे हा आता इथल्या गावकर्यांसाठी नवीन अनुभव राहिलेला नाही.
महावितरणकडून दरवर्षी पावसाळ्यापूर्वी खांबांची दुरुस्ती, विजेच्या तारा बदलणे, झाडांची छाटणी आदी कामे केली जातात. मात्र, पाऊस सुरू झाल्यावर याच कारणांवर बोट ठेवून अधिकार्यांचा संपर्क मिळणे कठीण होते, आणि सामान्य नागरिक पुन्हा अंधाराच्या छायेत ढकलले जातात.विजेचा पुरवठा कित्येक दिवस खंडित असून, केरोसिनची टंचाई असल्यामुळे घरातील दिवेही मूक झाले आहेत.
महिलांना स्वयंपाक करताना अडचणी येत असून, विद्यार्थ्यांचे अभ्यासही खंडित झाले आहेत. यात भर म्हणून महावितरणकडून बिलांमध्ये कोणतीही सवलत न देता नियमित बिल भरण्याची अपेक्षा ठेवली जात आहे. त्यामुळे ग्राहकांमध्ये संताप वाढला आहे.वीज नसल्याचा परिणाम शासकीय रुग्णालये, बँका, महाविद्यालये आणि व्यावसायिकांवरही झाला आहे. दवाखान्यांमध्ये रुग्णसेवा विस्कळीत झाली असून, बँकिंग व्यवहार व शैक्षणिक कामकाज ठप्प झाले आहे.
यासंदर्भात महावितरणच्या अधिकार्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांचे फोन ‘नॉट रिचेबल’ असल्याचे आढळले. दरम्यान, नेमका वीजपुरवठा केव्हा सुरू होणार, याचे ठोस उत्तर कोणाकडेही नाही.
वीज नसल्याचा सर्वाधिक फटका चारोटी, आंबोली, वाडा-खडकोना येथील सीएनजी पंपांना बसला आहे. सीएनजी नसल्यामुळे रिक्षा, इको कार, आणि इतर खासगी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून, अनेकांनी कर्जावर घेतलेल्या गाड्या उभ्या राहिल्याने चालकवर्ग आर्थिक अडचणीत आला आहे.