

तलासरी/पालघर : पुढारी वृत्तसेवा
उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने तलासरी तालुक्यात केलेल्या कारवाईत दमण बनवटीचा दारू साठा जप्त केला आहे. बुधवारी सकाळी तलासरी तालुक्यातील कूर्झ ठाकरपाडा रस्त्यावर केलेल्या कारवाईत दमण बनवटीचे विदेशी दारूचा ३६४ बल्क लिटर दारू साठा आणि कार मिळून दहा लाख ५४ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
कार चालकाविरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या कर्मचाऱ्यांना तलासरी तालुक्यातील कूर्झ ठाकरपाडा रस्त्यामार्गे दमण बनवटीची दारू तस्करी होणार असल्याची माहिती मिळाली होती.
माहिती नुसार उत्पादन शुल्क विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बुधवारी पहाटे कूर्शे-ठाकरपाडा रस्त्यावर सापळा रचला होता. सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास कूर्झ ठाकरपाडा रस्त्यावर एक संशयीत कार दिसून आली. कारचा पाठलाग सुरु केला असता कूर्जे धरण परिसरात कार उभी करून लकार चालक अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला.
उत्पादन शुल्क विभागाच्या कर्मचाऱ्यांनी कारची तपासणी केली असता कारमध्ये दमण बनवटीचा दारू साठा आढळून आला. कारमधील दमण बनवटीचे विदेशी दारूचा ३६४ बल्क लिटर दारू साठा आणि कार जप्त करण्यात आली आहे.
कारवाईत दहा लाख ५४ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कारवाई उत्पादन शुल्क विभागाच्या डहाणू कार्यालयाचे निरीक्षक सुनील देशमुख, भरारी पथकाचे निरीक्षक अरुण चव्हाण आणि शुल्क सीमा तपासणी नाका कर्मचाऱ्यांच्या मदती कारवाई करण्यात आली आहे.