

बोईसर ः बोईसरमधील यशवंत सृष्टी परिसरात असलेल्या एका नामांकित हॉटेलमध्ये सूपमधून झुरळ आढळून आल्याने खवय्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेची तक्रार अन्न व औषध प्रशासनाकडे (फूड अँड ड्रग) दाखल करण्यात आली असून, परिसरात अन्न स्वच्छतेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
बोईसर पूर्वेकडील नागझरी येथील एका ग्राहकाने संबंधित हॉटेलमध्ये सूप मागवले असता त्यामध्ये झुरळ असल्याचे निदर्शनास आले. हा प्रकार ग्राहकाने हॉटेल व्यवस्थापकाच्या निदर्शनास आणून दिला. त्याचवेळी घटनेचा व्हिडीओ मोबाईलमध्ये चित्रीत करून तो सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आला, ज्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांत तीव्र नाराजी व्यक्त होत असून, आरोग्याशी संबंधित अशा गंभीर बाबीकडे अन्न व औषध प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे. अशा प्रकारच्या अन्न विक्रीस्थळांवर तात्काळ छापे घालून कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
दरम्यान, फूड अँड ड्रग प्रशासनाचे अधिकारी गोपाल माहोर यांच्याकडे याप्रकरणी अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली असून, तपास सुरू असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. संबंधित हॉटेलवर लवकरच कारवाई होण्याची शक्यता वर्तवलीजात आहे.
दरम्यान, यापूर्वीही बोईसरजवळील बेटेगाव येथील एका मिठाई दुकानात मिठाईवरून उंदरे फिरत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. अशा घटनांमुळे ग्राहकांच्या आरोग्यावर गंभीर धोका निर्माण होत असून, संबंधित यंत्रणांनी वेळीच लक्ष देणे आवश्यक बनले आहे.