अजगराची शेपटी चिमुकल्याच्या हाती… सर्पमित्राला स्टंटबाजी पडणार महागात ?

Palghar News | पालघर येथील व्हायरल व्हिडीओमुळे खळबळ
Palghar News
लहानग्‍याने अजगराची शेपूट हातात घेतल्‍याचा व्हिडीओमुळे खळबळ उडाली.Pudhari Photo
Published on
Updated on

पालघर : साप वाचवण्याच्या नावाखाली काही सर्पमित्रांकडून जीवघेणी स्टंटबाजी सुरू असून, याचे परिणाम आता त्यांच्या गळ्यात येण्याची वेळ आली आहे. पालघर जिल्ह्यातील डहाणू येथील सर्पमित्र सागर पटेल याने केलेली धोकादायक स्टंटबाजी सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. लहानगा अजगर हाताळतानाचा एक धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर वायरल होत असून, या व्हिडिओमुळे सर्पमित्र सागर पटेलवर कारवाईची मागणी होऊ लागली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सागर पटेल याने काही महिन्यांपूर्वी एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता. या व्हिडिओमध्ये तीन ते चार वर्षांच्या एका चिमुकल्याच्या हाती थेट अजगराची शेपटी देण्यात आलेली दिसत होती. सागर पटेल स्वतः त्या अजगरासोबत असल्याचंही यात पाहायला मिळालं. हा व्हिडिओ सोशल मीडियावर स्टंट म्हणून अपलोड करण्यात आला होता. मात्र, कारवाईच्या भीतीने काही काळातच सागर पटेल याने तो इन्स्टाग्रामवरून हटवला.

पण तोवर उशीर झाला होता. काही तरुणांनी त्या व्हिडिओचे स्क्रीन रेकॉर्डिंग करून तो पुन्हा-पुन्हा सोशल मीडियावर व्हायरल केला. त्यामुळे या प्रकाराची दखल वन्यजीव प्रेमींनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी घ्यायला सुरुवात केली. ‘पीपल फॉर ॲनिमल वेल्फेअर’ संस्थेच्या वैशाली चव्हाण यांनी या प्रकारावर तीव्र संताप व्यक्त केला असून, सर्पमित्र सागर पटेल यांच्यावर तातडीने कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. “वन्य प्राण्यांचा वापर करून लोकप्रियता मिळवण्याच्या नादात कोणीही त्यांच्या किंवा सामान्य नागरिकांच्या जिवाशी खेळ करत असेल, तर तो प्रकार सहन केला जाणार नाही,” असं चव्हाण यांनी ठामपणे सांगितलं.

"लहान मुलांना सोबत घेऊन असा जीवघेणा स्टंट करणं अक्षम्य आहे. यामुळे त्या मुलाच्या आणि आजूबाजूच्या लोकांच्या जिवाला धोका निर्माण होतो," असंही चव्हाण यांनी स्पष्ट केलं.या प्रकरणावर डहाणू वनविभाग काय कारवाई करतो, याकडे सध्या सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. यापूर्वीही अशा प्रकारच्या स्टंट व्हिडिओंना केवळ प्रसिद्धीसाठी सोशल मीडियावर अपलोड केलं गेलं आहे. मात्र यावेळी लहानग्याचा जीव धोक्यात घालणाऱ्या सर्पमित्रावर कायदेशीर पातळीवर ठोस पावलं उचलली जातात का, याकडे आता वनविभागाच्या कृतीतूनच उत्तर मिळणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news