

वाडा : वाडा नगरपंचायत क्षेत्रातील जनता असंख्य समस्यांनी त्रस्त असताना शहराला वाली कोण असा प्रश्न विचारला नेहमीच विचारला जातो. मनसेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी नगरपंचायत कार्यालयात घेराव घालून शहराला भेडसावणाऱ्या प्रश्नांची जणू शाळा भरवून उजळणी घेतली. मुख्याधिकाच्यांनी दहा दिवसांत जनतेच्या प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत तर तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा देण्यात आला आहे.
नगरपंचायत कार्यालय नेमके उघडते व बंद होते कधी याची वेळ मागून ठेकेदारांना सायंकाळी उशीरा कार्यालयात हजर राहण्याची परवानगी आहे का असा प्रश्न विचारण्यात आला आहे. शहरातील जागोजागी उभारण्यात आलेल्या पाणपोई, स्वच्छतागृह व समविषम तारखांना करण्यात आलेल्या पार्किंग व्यवस्थेचे झाले काय असा सवाल विचारून नगर- सेवकांचा कालावधी संपल्या नंतर झळकविण्यात आलेल्या फलकांचा उद्देश काय असा प्रश्न विचारण्यात आला.
नगरपंचायत क्षेत्रातील गार्डन भूखंड व त्यावर आजपर्यंत करण्यात आलेल्या खर्च हा महत्वाचा मुद्दा यावेळी उपस्थित करण्यात आला आहे. वाडा शहरात मागील पाच ते सात वर्षात करण्यात आलेल्या अनेक कामांचा यावेळी पाढा वाचण्यात आला असून अनेक विषयांची माहिती मनसेने मागिवली आहे. तात्काळ माहिती मिळाली नाही तर मोठे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. तालुकाध्यक्ष कांतीकुमार ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली यावेळी कामगार सेनेचे देवेंद्र भानुशाली, स्वप्निल मोरे, मधुर म्हात्रे, उषा मोरे, मंगला निकम, ओंकार साळुंखे, शुभम आंबेकर प्रणय पाटील यांसह अनेक कार्यकर्ते सहभागी होते.