

कासा : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (माकपा) व ‘सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स’ यांच्या ठाणे-पालघर जिल्हा समितीच्या वतीने 9 जुलै रोजी चारोटी येथे मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर तीव्र रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे महामार्गावरील दोन्ही बाजूंनी वाहतूक पूर्णतः ठप्प झाली होती, परिणामी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
या आंदोलनात कामगार, योजना कर्मचारी, शेतकरी, अंगणवाडी कर्मचारी, हमाल, मच्छीमार, बांधकाम कामगार, स्थलांतरित मजूर अशा विविध घटकांनी सहभाग नोंदवत केंद्र व राज्य सरकारच्या कामगारविरोधी आणि खासगीकरणास पोषक धोरणांचा तीव्र निषेध केला.
आंदोलनस्थळी उपस्थित आमदार कॉ. निकोले यांनी भाषणात केंद्र व राज्य सरकारच्या जुलमी धोरणांवर जोरदार टीका केली. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, श्रम कायद्यातील कामगारविरोधी सुधारणांमुळे कामगारांचे मूलभूत हक्क धोक्यात आले आहेत. आम्ही हे सहन करणार नाही. सध्या अधिवेशन सुरु असून आपण यातील मागण्या सरकार दरबारी मांडणार असल्याचे ही आमदार निकोले यांनी सांगितले.
यावेळी कामगार विरोधी 4 श्रम संहिता तात्काळ रद्द कराव्यात,ईपीएफ मधील लोकशाही विरोधी बदल मागे घ्यावेत, 26 आठवड्यांची पगारी माता रजा लागू करावी, सर्व किमान वेतन 21,000 रुपये मासिक करावे, अंगणवाडी सेवा वर्षभर सुरु ठेवावी, कामगारांना नियमित दर्जा द्यावा, कंत्राटी, तात्पुरत्या व शोषण करणार्या भरती प्रक्रिया थांबवाव्यात, महागाई रोखण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात.
महागाई भत्त्याचा योग्य हिशोब लागू करावा, शेतकर्यांना हमी दर द्यावा, कृषी कामगार, स्थलांतरित, मच्छीमार, बांधकाम व घरकामगारांना सामाजिक सुरक्षा द्यावी, योजना कर्मचार्यांना शासकीय मान्यता व न्याय्य वेतन द्यावे, सार्वजनिक उपक्रमांचे खाजगीकरण थांबवावे आदी मागण्या आंदोलकानी सरकार दरबारी आंदोलनाच्या माध्यमातून आंदोलकांनी घोषणाबाजी करत सरकारविरोधी रोष व्यक्त केला. अनेक महिला कामगारही मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.
हा रस्ता रोको आंदोलन म्हणजे केंद्र व राज्य शासनाला एक स्पष्ट इशारा होता - कामगारांचे हक्क आणि सामाजिक सुरक्षेच्या मागण्यांकडे आता दुर्लक्ष केले जाणार नाही. अशी भावना उपस्थितांमध्ये दिसून आली.