

खानिवडे (पालघर) : विरार पूर्वेतील विरारफाट्यावरील उड्डाण पुलाच्या मुंबई वाहिने ते विरार फाटा अश्या दोन बाजूने जाणाऱ्या रस्त्याच्या दुभाजक रस्त्यावर अगदी सुरुवातीलाच एक सिमेंटचा अवजड बॅरिकेट मागील महिन्याभरापासून कसाही आडवा ठेवण्यात आला आहे. त्याचा फटका एका दुचाकी चालकाला बसला आहे.
या बॅरिकेटला धडकून त्याचा अपघात झाला आहे. या उड्डाणपुलावर असलेली प्रकाश व्यवस्था बंद असल्याने तो बॅरिकेट दुचाकी चालकाला रात्रीच्या अंधारात दिसला नाही. त्यामुळे तो महामार्गावरून विरारकडे जाण्यासाठी वळला असता या अवजड बॅरिकेटला जोरदार धडकला व अपघात झाला. यामध्ये त्याच्या पायाला गंभीर मार लागला असून दोन ठिकाणी फॅक्चर झाले आहे. सद्ध्या त्याला उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. शनिवारी रात्री घडलेल्या या अपघातातील दुचाकी चालकाचे नाव सोनू यादव असे आहे. या अगोदर चार महिन्यांपूर्वी अश्याच प्रकारे कसेही ठेवलेल्या सिमेंट बॅरिकेट मुळे सकवार व कोपरफाटा येथे तिघा दुचाकी स्वारांना आपला जीव गमवावा लागला आहे.
दरम्यान देशाच्या सर्वात व्यस्त असलेल्या मुंबई दिल्ली या ४८ क्रमांकाच्या पालघर जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्गावरील घोडबंदर ते मनोर दरम्यान अनेक ठिकाणी सिमेंटचे अवजड बॅरिकेट रस्ते कामानिमित्त काही ठिकाणी ठेवण्यात आले आहेत. मात्र ते काम झाल्यानंतरही तसेच असून कसेही ठेवण्यात आले आहेत. यामुळे रात्रीच्या अंधारात ते चालकांना दिसत नसल्याने अपघात घडत आहेत. याचा फटका निष्पाप नागरिकांना बसत असून त्यांना जीवास मुकावे लागते किंवा गंभीर व्हावे लागते आहे. अश्या अपघाती घटना घडत असल्याने ते धोकादायक बॅरिकेट त्वरित हटवावेत अशी मागणी चालक व प्रवाश्यांकडून विशेषतः दचाकी चालकांकडून करण्यात येत आहे.