.jpg?rect=0%2C0%2C652%2C367&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?rect=0%2C0%2C652%2C367&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
विक्रमगड : पुढारी वृत्तसेवा
पालघर जिल्ह्यातील सहा विधानसभेसाठी उमेदवारांनी प्रचार सुरू केला आहे. मात्र भातकापणीसाठी आणि वीटभट्टीवर मोठ्या प्रमाणात मजूर स्थलांतरित झाल्याने तसेच शेतकरीवर्ग सहपरिवार शेतात जात आहेत. त्यामुळे गावात आलेल्या उमेदवारांना वयोवृध्दांशी संवाद साधावा लागत आहे.
रात्री गावोगावी प्रचार सभा, कॉर्नर बैठका होत आहेत. मात्र या बैठकांना दिवसभर शेतात राब राब राबून आलेला शेतकरी, मजूर वर्ग हजेरी लावत नसल्याने या सभेलाही गर्दी दिसून येत नाही.
दिवाळी झाल्यानंतर भात कापणीसाठी पालघर जिल्ह्याच्या विक्रमगड, जव्हार, डहाणू तलासरी तालुक्यातील मजुरांनी स्थलांतर केल्याने तसेच वीटभट्टीसाठी देखील अनेक कुटुंब स्थलांतरित झाल्याने सध्या राजकिय पक्षांना प्रचारासाठी माणसं मिळत नाहीत.
भात कापणी आणि भात जोडणीसाठी पाचशे ते सातशे रुपये मजुरी झालेली आहे. त्यातच मुलांना देखील सुट्ट्या असल्याने घरातील सर्व सदस्य यंदा शेतात भातकापणीसाठी जात आहेत. तरुण वर्गही कामावर जात असल्याने गावात शुकशुकाट निर्माण झालेला आहे.
अशा परिस्थितीमध्ये प्रचारासाठी आलेल्या उमेदवारांना अनेक गावात मतदार नसल्याने आले तसे परत जावे लागत आहे. आपला नेता गावात येणार असल्याने गर्दी जमवावी यासाठी गाव पुढारी मतदारांच्या आतापासूनच पाया पडत साहेब येणार आहेत, आजच्या दिवस थांबा म्हणून विनंती करत आहेत.
मात्र शेतात तयार झालेले भातपीक, कामावरून सुटी मिळत नसल्याने शेतकरी आणि कामगार थांबत नाहीत. त्यामुळे उमेदवारासोबत आलेले चार-दोन कार्यकर्ते गावातील वयोवृद्धांशी संवाद साधताना दिसत आहेत,
गावात मतदार नसल्याने उमेदवार शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन मतदारांशी संवाद साधत आहेत. शेत बांधावर बैठका घेत आहेत. मात्र एक गेला की दुसरा उमेदवार येत असल्याने कामात व्यस्त असलेल्या मतदारांना त्यांचे म्हणणे ऐकण्यात काही रस दिसत नाही.