

पालघर ः केंद्र सरकारच्या महत्वपूर्ण प्रकल्पापैकी एक असलेला मुंबई अहमदाबाद अति जलद बुलेट ट्रेन प्रकल्प पालघर जिल्ह्यातून जात आहे. पालघर तालुक्यात जलसार, टेंभी खोडावे, विराथन या परिसरात बुलेटच्या बोगद्याचे काम सुरू असून या ठिकाणी होणार्या सुरुंग स्फोटामुळे परिसरातील गावातील घरांचे नुकसान होत असल्याची बाब समोर आली आहे. खोदकामासाठी केल्या जाणार्या स्फोटामुळे घरांना तडे जाऊ लागले असून पत्रे तुटल्याच्या घटना घडल्या आहेत.
जलसार गावाच्या लगत असणार्या डोंगरामधून बुलेट ट्रेनसाठी बोगदा उभारण्यासाठी केल्या जाणार्या सुरुंगास्फोटांची तीव्रता जास्त असून तब्बल एक ते दीड किलोमीटर पर्यंतच्या परिसरातील घरांची नुकसानी झाली आहे. या स्फोटांमुळे जलसार, टेंभीखोडावे व विराथन बुद्रुक या गावांमधील 200 पेक्षा अधिक घरांच्या भिंतीला व फरशीला तडे गेले आहेत.
पुढेही स्फोट सुरू राहणार असल्याने आणखीन घरांच्या नुकसानीची शक्यता आहे. मात्र प्रशासन या प्रकाराकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येते. नुकसान भरपाई चे आश्वासन देण्यात आले असले तरी दारशेत पाडा, पाटील पाडा, किराटपाडा, गेट पाडा, आदी जुन्या जहराल पाड्यातील 200 पेक्षा अधिक घरांच्या नुकसानभरपाईचा प्रश्न निरुत्तर आहे.
स्फोटांमुळे दारशेत पाडा परिसरात घरांच्या जवळच स्फोट घडवून आणले जात आहेत. त्यामुळे अंगणवाडीचे छत कोसळणे, घरांमधील मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याचे प्रकार घडले आहेत. यांमुळे ध्वनी प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत असल्याचे नागरिक सांगत आहेत. नुकसान भरपाई संदर्भात आवश्यक ती कार्यवाही केली जाणार असल्याचे प्रकल्प व्यवस्थापनाचे दिल्लीतील जनसंपर्क अधिकारी यांनी या विषयाबाबत बोलताना सांगितले.