नेवाळी : अंबरनाथ औद्योगिक क्षेत्रातून डोंबिवलीच्या दिशेने जाणारा कंटेनर वसार गावाजवळ उलटून अपघात झाला. हा अपघात शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडला. महामार्गाच्या काँक्रिटीकरणाचे काम सुरू असल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून हा कंटेनर पलटी झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. दरम्यान वाहतूक पोलीस व हिललाईन पोलीस अपघातस्थळी दाखल झाले असून कंटेनर बाजूला करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
डोंबिवली, अंबरनाथ महामार्गावर शुक्रवारी पहाटेपासूनच वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तसेच वसार गावाजवळ कंटेनर पलटी झाल्याने वाहतूक कोंडी झाली. या कंटेनरमध्ये अवजड साहित्य असल्याने कंटेनरला बाजूला करण्यात देखील अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे या परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी झाली.
गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेले महामर्गाच्या कॉंक्रिटीकरणाचे काम अद्याप अपूर्ण राहील असल्याने आता अपघाताच्या मालिका सुरू झाल्या आहेत. या आधी देखील या परिसरात मोठ्या प्रमाणात अपघात झाले आहेत. एमआयडीसी क्षेत्रातून अन्य औद्योगिक क्षेत्रात जाणाऱ्या वाहनांना सर्वाधिक मनस्ताप या परिसरात सहन करावा लागला.
नेवाळी नाका ते पाले गावापर्यंत मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य देखील निर्माण झाले आहे. खड्डे चुकवताना आणि महामार्गावरील रस्ते क्रॉस करताना अपघातांची मालिका सुरु राहिली तर याचा मोठा फटका औद्योगिक क्षेत्रासह सर्व सामान्य नागरिकांना देखील सहन करावा लागणार आहे. शुक्रवारी झालेल्या या अपघातामुळे परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाल्याने वाहनचालक हैराण झाले होते. त्यानंतर तातडीने वाहतूक पोलिसांनी अपघातस्थळी अतिरिक्त कुमक तैनात करून वाहतूक कोंडी कमी करण्याचे काम हाती घेतले आहे.