

बोईसर ः पालघर तालुक्यातील आंबेदे गावात मुसळधार पावसामुळे आलेल्या पुराच्या पाण्याने प्रचंड हानी केली असून, पोल्ट्री व्यवसायावर त्याचा मोठा फटका बसला आहे. निलेश शिवराम पावडे यांच्या पोल्ट्रीतील तब्बल चार हजार कोंबड्यांचा बळी गेल्याने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात अवकाळी आणि जोरदार पावसाचा तडाखा बसत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सार्वजनिक सुट्टी जाहीर केली होती. मंगळवारी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास आंबेदे गावातील सूर्या नदीला जोडणार्या नाल्याला अचानक पूर आल्याने गावातील अनेक भाग जलमय झाले. त्याचवेळी पावडे यांच्या पोल्ट्रीत पाणी शिरले.
पोल्ट्रीत सुमारे पाच हजार कोंबड्या होत्या, मात्र त्यापैकी तब्बल चार हजार कोंबड्या पाण्यात गुदमरून मृत्युमुखी पडल्या.या दुर्घटनेमुळे पावडे यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. पोल्ट्री हा त्यांचा मुख्य व्यवसाय असल्याने या आपत्तीतून सावरणे त्यांच्या दृष्टीने कठीण होणार आहे. मी डोळ्यासमोर हजारो कोंबड्या पाण्यात बुडताना पाहिल्या, काहीच करू शकलो नाही असे भावनिक उद्गार पावडे यांनी व्यक्त केले आहेत.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी पोल्ट्री परिसरात धाव घेतली. मात्र, तोपर्यंत नुकसान झालेले होते. गावातील नागरिक तसेच शेतकरी संघटनांनी प्रशासनाने तातडीने पंचनामा करून पावडे यांना शासकीय मदत द्यावी, अशी मागणी केली आहे. पूरामुळे शेतकर्यांचेच नव्हे तर पोल्ट्री व्यवसायिकांचेही हाल होत आहेत.
शासनाने त्वरित मदत जाहीर करावी असे स्थानिकांचे म्हणणे आहे.जिल्ह्यातील पावसाचा फटका शेतीपुरताच मर्यादित न राहता दुग्ध व्यवसाय, पोल्ट्री व्यवसाय आणि उदरनिर्वाह करणार्या शेतकर्यांनाही बसत असल्याने शेतकरी वर्गात चिंता वाढली आहे.