

कासा ( पालघर ) : डहाणू तालुक्यातील कासा ग्रामपंचायत हद्दीतील सूर्या नदीच्या काठावरील स्मशानभूमीत अघोरी विद्येशी संबंधित साहित्य आढळून आल्याने स्थानिकांमध्ये खळबळ उडाली आहे. गुरुवारी (दि.13) सकाळी काही ग्रामस्थ नियमितप्रमाणे परिसरात गेले असता गुलाल, अबीर, शेंदूर, लाल कपडा, लिंबू, फुल, तांदूळ तसेच लाकडी साहित्य अशा संशयित वस्तू त्यांना आढळल्या.
यानंतर तातडीने इतर ग्रामस्थांना बोलावून स्मशानभूमी परिसराची स्वच्छता करण्यात आली. ग्रामस्थांनी सांगितले की, अशा प्रकारचे साहित्य सामान्यतः स्मशानभूमी परिसरात वापरले जात नाही. त्यामुळे हा अघोरी विद्येचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याच प्रकारची घटना काही महिन्यांपूर्वी सातवलीजवळील नदीकिनारीही उघड झाल्याने जिल्ह्यात अशा घटनांची मालिका सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे.
या घटनांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे तसेच संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्यात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा अस्तित्वात असताना देखील काही ढोंगी आणि समाजकंटक व्यक्तींमार्फत असे प्रकार घडत असल्याबद्दल ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
जनजागृतीची मागणी
ग्रामस्थांनी पोलीस प्रशासन व संबंधित विभागांनी अशा प्रकारांवर तात्काळ तपास करून दोर्षीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. तसेच परिसरात रात्री गस्त वाढविणे, सीसीटीव्ही बसविणे आणि अशा अंधश्रद्धाजन्य घटनांना प्रतिबंध करण्यासाठी जनजागृती करण्याचीही मागणी नागरिकांकडून होत आहे. स्थानिक प्रशासनाकडून या प्रकरणाबाबत कोणती पावले उचलली जातील, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.