

पालघर : अदानी समूहाने अधिग्रहित केलेल्या आयटीडी सिमेंटेशन कंपनीला हरित वाढवण बंदर प्रकल्पाच्या भरावासाठी व किनारा संरक्षित भिंती संदर्भातील कामे करण्यासाठी नियुक्त करण्यात आले आहे. या कंपनीने किनारा क्षेत्र विकास कामासाठीच्या या निविदा प्रक्रियेमध्ये सर्वात कमी व वाजवी बोली लावली होती. त्यामुळे नियमानुसार आयटीडी सिमेंटेशनला अभियांत्रिकी, खरेदी आणि बांधकाम (इपिसी) तत्त्वावर हे काम वाढवण पोर्ट प्रोजेक्ट लिमिटेडच्या संचालक मंडळाच्या आठव्या बैठकीत सोमवारी घोषित करण्यात आले.
अलीकडेच वाढवण बंदर पोर्ट प्रोजेक्ट लिमिटेडमार्फत वाढवण बंदर प्रकल्पाच्या किनारा क्षेत्रात २०० हेक्टर परिसराचा विकास करण्यासाठी निविदा मागवण्यात आल्या होत्या. या विकास कामात किनारा भराव व किनारा संरक्षित भिंत व इतर कामांचा समावेश आहे. हे काम १७७० कोटींच्या जवळपासचे आहे. त्यामध्ये अदानी समूहाची संबंधित असलेली आयटीडी सिमेंटेशन कंपनीसह मॅन इन्फ्रा कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड व नवयुगा इंजीनियरिंग कंपनी लिमिटेड या तिघांनी सहभाग घेतला होता.
वाढवण बंदराच्या किनारी क्षेत्रातील प्रथम टप्प्याच्या या कामासाठी आयटीडी सिमेंटेशन कंपनीने हे कंत्राट प्रकल्प विकासाच्या अंदाजित रकमेच्या तुलनेत अंदाजित खचपिक्षा ६.८९ % कमीची निविदा भरली होती. या प्रकल्पाची किंमत जवळपास १७७० कोटी इतकी ठरवण्यात आली होती. सिमेंटेशन कंपनीने आपल्या बोलीमध्ये ही रक्कम १६४८ इतकी म्हटली होती. इतर दोन निविदाकारांच्या तुलनेत आयटीडी सिमेंटेशन इंडिया लिमिटेडने सर्वात कमी निविदा रक्कम बोली लावल्यामुळे या कंपनीला हे काम देण्यात आले आहे. मॅन इन्फ्रा कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने १७५५ कोटी रुपयांची म्हणजे प्रकल्प किमतीपेक्षा जवळपास पूर्णांक आठ टक्के कमी बोली
लावली होती. तर नवयुगा इंजीनियरिंग कंपनी लिमिटेडने या कामासाठी २०७० कोटी रकमेची निविदा म्हणजे प्रकल्प किमतीच्या १६. ९४% अधिक बोली लावली होती. त्यामुळे सर्वात कमी निविदा बोली लावणाऱ्या आयटीडी सिमेंटेशनला हे कंत्राट देण्याची घोषणा केली. हरित वाढवण बंदर प्रकल्प समुद्राच्या आत उभारला जाणार आहे.