

पालघर ः पालघर तालुक्याच्या पूर्वेकडील वरई पारगाव रस्त्यावरील नावझे गावात मासे पकडण्यासाठी लावलेल्या जाळ्यात सोमवारी सकाळी एक दहा ते बारा फूट लांबीचा अजगर अडकल्याचे आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली होती. सर्पमित्राच्या मदतीने अजगराची जाळ्यातून सुरक्षितपणे बाहेर काढून अजगराला नैसर्गिक अधिवासात सोडले.
नावझे गावातील शेतकरी रमेश पाटील यांनी त्यांच्या शेतात मासे पकडण्यासाठी जाळे लावले होते. सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे शेतावर जाळे तपासण्यासाठी गेले असता त्यांना जाळ्यात एक मोठा अजगर अडकलेला दिसला. सुमारे दहा ते बारा फूट लांबीचा अजगर जाळ्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होता. या प्रयत्नात अजगर जाळ्यात अधिकच गुरफटला गेला होता.
रमेश पाटील यांच्या शेतातील जाळ्यात अडकलेल्या अजगराला पाहण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. ग्रामस्थांपैकी एकाने स्थानिक सर्पमित्रांशी संपर्क साधून जाळ्यात अडकलेल्या अजगराची माहिती दिली. थोड्या वेळात सर्पमित्र घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी अत्यंत काळजीपूर्वक अजगराला जाळ्यातून बाहेर काढले.
अजगराची पाहणी केली असताना अजगराला कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नसल्याचे आढळून आले. सर्पमित्रांनी अजगराला नेऊन जंगलातील नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडून देण्यात आले. अजगराची सुटका आणि नैसर्गिक अधिवासात सोडल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.