नाशिक : थकीत वेतनाचे कारण देत तपोवन डेपोतील वाहकांनी शुक्रवारी (दि. २१) सकाळी अचानक पुकारलेला संप सिटीलिंक प्रशासनाने अवघ्या 10 तासांमध्ये मोडीत काढला. आंदोलक वाहकांविरोधात आडगाव पोलिस ठाण्यात मेस्माअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, दुपारी ४ नंतर तपोवन डेपोतून २५ बसेस सोडण्यात आल्याचा दावा सिटीलिंकतर्फे करण्यात आला आहे. दरम्यान, अचानक झालेल्या या संपाचा विद्यार्थी तसेच चाकरमान्यांना मात्र फटका बसला.
'मॅक्स डिटेक्टिव्ह ॲण्ड सिक्युरिटीज' यांनी सिटीलिंकच्या कर्मचाऱ्यांचे वेतन रखडवले आहे.
त्यामुळे अखेरचा पर्याय म्हणून वाहकांना संपाचे हत्यार उपसावे लागले.
वाहकांनी अचानक संप पुकारल्याने सिटीलिंकची सेवा पुन्हा ठप्प झाली आहे.
'मॅक्स डिटेक्टिव्ह ॲण्ड सिक्युरिटीज' हा वाहक पुरवठादार ठेकेदार सिटीलिंकसाठी शाप ठरला आहे. या ठेकेदाराच्या आडमुठेपणामुळे गेल्या तीन वर्षांत सिटीलिंकला 10 वेळा संपाला सामोरे जावे लागले आहे. ठेकेदाराकडून नियमित वेतन न मिळणे, अपुरे वेतन, ग्रॅच्युइटी व भविष्य निर्वाह निधी रक्कम अदा न करणे, कर्मचाऱ्यांवर अन्यायकारक दंडात्मक कारवाई अशा विविध कारणांमुळे वाहकांना संपाचे हत्यार उपसावे लागले. गेल्या मार्चमध्ये वाहकांनी पुकारलेला संप सर्वाधिक काळ अर्थात सलग नऊ दिवस चालला. या संपावर तोडगा काढण्यासाठी सिटीलिंक प्रशासनाने ठेकेदाराला वाहकांच्या वेतनासाठी फेब्रुवारीचे ६५ लाखांचे आगाऊ देयक अदा केले. तसेच पीएफ व ईएसआयसीचे एक कोटीही भरले. त्यानंतरही वाहक पुरवठादार ऐकत नसल्यामुळे पालिकेने ठेका रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. अखेर ठेकेदार, वाहक नरमल्याने सिटीलिंकची सेवा पूर्ववत सुरू होऊ शकली. त्यानंतर गेल्या दोन महिन्यांपासून सेवा सुरळीत सुरू असताना शुक्रवारी (दि. २१) पहाटे 5 पासून वाहकांनी अचानक संप पुकारल्याने सिटीलिंकची सेवा पुन्हा ठप्प झाली.
सिटीलिंकने ठेकेदाराला मे महिन्याच्या वेतनाचे देयक अदा केले आहे. मात्र ठेकेदाराने वाहकांना वेतन अदा केलेले नाही. सिटीलिंकने ठेकेदाराला बोनसची रक्कम दिली असतानाही ठेकेदाराने वाहकांना ती दिली नाही. तसेच रजेच्या कालावधीतील वाहकांचे ६५ लाख रुपये सिटीलिंकने ठेकेदाराच्या खात्यावर वळते केले असले, तरी ठेकेदाराने ते वाहकांना दिले नसल्यामुळे वाहकांनी संपाचा निर्णय घेतला. या प्रकरणात ठेकेदाराने वाहकांबरोबरच सिटीलिंकचीही फसवणूक करण्याचा प्रयत्न केला आहे.
वारंवार होणाऱ्या संपामुळे शहर बससेवा ठप्प होऊन प्रवाशांना त्रास सहन करावा लागत असल्यामुळे सिटीलिंक प्रशासनाने कर्मचाऱ्यांना मेस्मा कायदा लागू केला आहे. त्यामुळे सिटीलिंकने तत्काळ आडगाव पोलिसांना पत्र देऊन संपकरी वाहकांविरोधात गुन्हा दाखल केला. आडगाव पोलिसांनी तपोवन डेपोत ठाण मांडत वाहकांचा संप मोडीत काढला. त्यामुळे सायंकाळपर्यंत डेपोतून २५ बसेस बाहेर निघाल्या असून, शनिवार (दि. 22) पासून सेवा पूर्ववत सुरू होईल, असा दावा सिटीलिंकने केला आहे.
वाहक पुरवठादार ठेकेदाराने वाहकांना मे महिन्याचे वेतन अदा न केल्यामुळे तपोवन डेपोतील वाहकांनी सकाळपासून संप पुकारला होता. या कर्मचाऱ्यांना मेस्मा लागू असल्यामुळे बेकायदेशीर संप पोलिसांच्या साहाय्याने मोडीत काढण्यात आला. प्रवाशांना झालेल्या त्रासाबद्दल दिलगीर आहोत.
- मिलिंद बंड, महाव्यवस्थापक (संचलन), सिटीलिंक.